माडगुळेत ब्राह्मण कुटुंब करते पिराची आराधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:31 AM2021-09-24T04:31:03+5:302021-09-24T04:31:03+5:30
अविनाश बाड आटपाडी : थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचे माडगुळे (ता. आटपाडी) गावावर नितांत प्रेम होते. ‘माझा गाव’ ...
अविनाश बाड
आटपाडी : थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचे माडगुळे (ता. आटपाडी) गावावर नितांत प्रेम होते. ‘माझा गाव’ या कवितेत त्यांनी ‘जाती जमाती इथे जन्मती सुखे नांदण्यास, पिरास करतो नवस मराठा मियां मारुतीस!’ असे वर्णन केले आहे. खरोखरच माडगुळे गावच्या पिराची सर्व देखभाल आणि पूजाअर्चा गेल्या कित्येक पिढ्या ब्राह्मण कुटुंब करीत आहे.
श्रीमती इंदिरा मोरेश्वर कुलकर्णी (वय ९३) आणि त्यांचा मुलगा भाऊसाहेब (वय ५८) यांच्यासह त्यांचे कुटुंब नित्यनेमाने लौकिकार्थाने मुस्लिम समाजातील या पिराची सर्व व्यवस्था पाहतात. विशेष म्हणजे, या पिराचे दर्शन घेण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातील भाविक येतात.
लोकवर्गणीतून गावातील खंडोबा, मारुती मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. पण ज्या गावात मुस्लिम समाजाचे केवळ एक कुटुंब आहे, तिथे मंदिरांचा आर्थिक हिशेब पाहणाऱ्या भाऊसाहेब कुलकर्णी यांनी स्वतःच्या जागेत असलेल्या पिराचाही कायापालट केला. आधी उघड्यावर असलेल्या या पिराच्या सभोवती लोखंडी जाळी बसवून वर छत केले. गावातीलच नव्हे तर कराड ते सोलापूर या परिसरातील गुरव, मराठा, मुस्लिम यांच्यासह हिंदू येथे माथा टेकवतात.
चौकट
भारत माझा देश आहे
भाऊसाहेब कुलकर्णी यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी आयुष्यभर मंदिराबरोबरच आपल्या जागेतील पिराची आराधना केली. पुढे त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी, मुले यांनी हा धडा आता नातवांना शिकवला आहे. हे कुटुंब जसे पिरासाठी खास मलिदा (प्रसाद) करते, तसाच मलिदा मुस्लिम भाविकही आणतात.
कोट
धार्मिक सहिष्णुतेला बळकटी देणारे, सगळे मानव समान आहेत आणि जाती-धर्मापलीकडे जाऊन बंधुभाव निर्माण करणारे हे एकात्मतेचे प्रतीक आहे. या कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
- सादिक खाटीक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मुस्लिम खाटीक संघटना
कोट
गावातील सर्व समाजातील मंडळी जसे मंदिरात दर्शनासाठी जातात तसेच पिराला येतात. आमचे कुटुंब पिढ्यान् पिढ्या हे करते. आजपर्यंत आम्ही ही व्यवस्था पाहतो म्हणून कधी कोणीच चुकीचे म्हटलेले नाही. आमच्या जागेत आहे हेच आमचे भाग्य.
- भाऊसाहेब कुलकर्णी, माडगुळे