माडग्याळचे रुग्णालय दहा वर्षांपासून ‘आजारी’

By admin | Published: April 27, 2016 10:37 PM2016-04-27T22:37:00+5:302016-04-28T00:13:37+5:30

शाळेच्या इमारतीत रुग्णालय : ग्रामीण रुग्णालयावर ५५ गावांचा भार; सुविधांचाही अभाव--ग्रामीण रुग्णालय सलाईनवर - १

Madgulkar hospital 'sick' for ten years | माडग्याळचे रुग्णालय दहा वर्षांपासून ‘आजारी’

माडग्याळचे रुग्णालय दहा वर्षांपासून ‘आजारी’

Next

गजानन पाटील -- संख --ग्रामीण भागातील जनतेच्या प्रमुख गरजांपैकी एक गरज वैद्यकीय सेवा-सुविधा होय. विकासापासून मुळातच कोसो दूर असलेल्या जतसारख्या तालुक्यातील सरकारी सेवा रामभरोसे सुरु आहे. जत पूर्व भागातील सुमारे ५५ गावे माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. हे ग्रामीण रुग्णालय २००६ पासून आजारी पडले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांवर तर उपचार सोडाच, आता ग्रामीण रुग्णालयालाच उपचाराची गरज निर्माण झाली आहे. कन्नड शाळेच्या इमारतीत भरणाऱ्या या रुग्णालयास वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची, सुसज्ज इमारतीची ‘वानवा’च आहे. अशा स्थितीत मागील १० वर्षांपासून माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या समस्यांवर प्रकाश टाकणारी ही मालिका...

जिल्ह्यामध्ये विस्ताराने मोठा असलेला जत तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील एकूण गावांची संख्या १२३ इतकी आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या ३ लाख ३४ हजार २३९ इतकी आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या १ लाख ७० हजार ९९६, तर स्त्रियांची संख्या १ लाख ६३ हजार २४३ इतकी आहे. हजारी लिंग प्रमाण स्त्रिया ९१८ इतके आहे. लोकांचे अज्ञान, वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे बालमृत्यू दरही अधिक आहे. तसेच उमदी विभागातील बालमृत्यू दर ५.८३, तर उपजत मृत्यू दर १.१६ इतका आहे.
ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यामध्ये दोन ग्रामीण रुग्णालये, ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्याअंतर्गत ४२ उपकेंद्रे कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ ते १८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामस्थांना आरोग्याच्या नागरी सुविधा पुरविल्या जातात. रुग्णांना विविध आजारांवर उपचार, कुटुंबनियोजन, गरोदर, स्तनदा माता, पल्स पोलिओ व इतर बालकांसाठी लस मोहीम यासारख्या आरोग्य सुविधा दिल्या जातात.
तालुक्यामध्ये जत व माडग्याळ येथे ग्रामीण रुग्णालय आहे, तर संख, उमदी, डफळापूर, शेगाव, बिळूर, कोंतेवबोबलाद, वळसंग, येळवी या ८ ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्याअंतर्गत चार गावांचे मिळून एक उपकेंद्र आहे. अशी तालुक्यात ४२ उपकेंद्रे आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १६ जागा वैद्यकीय अधिकारी यांच्या आहेत. त्यापैकी ५ जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. तसेच आरोग्य सेवक-सेविका, मलेरिया परिचारक, परिचारिका, औषध निर्माता, सुपरवायझर, शिपाई यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. बिघडलेली आरोग्य सेवा सुधारण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (क्रमश:)

संख प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यस्तरीय पुरस्कार
संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय ‘आनंदीबाई जोशी पुरस्कार’ मिळाला आहे. त्याअंतर्गत ५ उपकेंद्रे आहेत. दरीबडची, आसंगी तुर्क, मुचंडी, अंकलगी, तिकोंडी ही उपकेंदे्र आहेत. लोकांना चांगली आरोग्य सुविधा मिळत असल्यामुळे सर्वसामान्यांची ती आधार केंदे्र बनली आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओपीडी, कुटुंबनियोजन, प्रसुतीच्या सरासरी केसीस तालुक्यामध्ये सर्वाधिक आहेत. लोकवर्गणीतून सुसज्ज, सर्व सोयींनीयुक्त आरोग्य केंद्र सुरू आहे.

Web Title: Madgulkar hospital 'sick' for ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.