माधवनगरचे रुपडे पालटले, बाजारपेठेस उभारी
By admin | Published: June 23, 2016 11:34 PM2016-06-23T23:34:24+5:302016-06-24T01:13:40+5:30
गावाला २००५ नंतर उर्जितावस्था : महापालिका क्षेत्राचा परिणाम, व्यावसायिकांची मोठी गुंतवणूक
गजाजन साळुंखे -- माधवनगर -विकासात अनेक अडथळे येत असताना आणि व्यापारी पूर्णत: उद्ध्वस्त झाले असे वाटत असताना, २००५ नंतर मात्र माधवनगरने पुन्हा उभारी घेतली. सांगली महापालिका क्षेत्रालगत गाव असल्याने नागरीकरण केव्हाच चिकटले होते.सांगलीपासून अवघ्या दोन-पाच मिनिटावर असणाऱ्या माधवनगरच्या शेती क्षेत्रावर शहरीकरणाचा पहिला परिणाम झाला. मुळात माधवनगरला शेती होती. मात्र व्यापारीपेठ असल्याने जागेचा वापर वाणिज्य कामासाठी होत होता. सांगली शहराचा आणि माधवनगरचा संबंध येथील गोदामांमुळे दृढ झाला. सांगलीतील जकात चुकवण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी माधवनगरमध्ये गोदामे घेतली होती. त्यामुळे शहराबाहेर जकात वाचवून व्यापार सुरू होता. त्याचा फायदा माधवनगरला झाला. गोदामांमुळे येथील जागा भाड्याने देण्याचा व्यवसायच सुरू झाला. उत्पन्नाचे साधन मिळाले. त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवसाय उभा राहिला. या दरम्यान गावाच्या पूर्व बाजूस संजय औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. तेथेही लहान-मोठे उद्योग उभे राहू लागले. सुरुवातीला हा वेग अतिशय संथ होता. मात्र गावातील व्यापारी-उद्योजकांनी पुढाकार घेऊन या औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे ही वसाहत मोठ्या प्रमाणात विकसित झाली.
बघता-बघता माधवनगरमध्ये नवीन उद्योग-व्यवसाय उभे राहू लागले. कॉटन मिल बंद झाल्यानंतर गावासाठी हा आशेचा किरण होता. आज दोन हजारांहून अधिक कामगारांना येथे काम मिळाले आहे. विशेष म्हणजे येथे महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.
गावातही लहान-मोठे व्यवसाय वाढीस लागले. कापडउद्योगात नवे प्रयोग सुरू झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती पुन्हा सुरू झाली. शहर व नागरीकरणामुळे जागेचे भाव वाढू लागले. शेतजमिनीचे प्लॉट पडू लागले. गुंठेवारी क्षेत्रात वाढ सुरू झाली. हनुमाननगर, कर्नाळ रस्ता, आनंदीनगर, कॉटन मिल परिसर, ग्रामपंचायत परिसरात नागरी वस्ती निर्माण झाली. संजय औद्योगिक वसाहत परिसरात अष्टविनायक कॉलनी निर्माण झाली.
त्यामुळे वाढत्या नागरीकरणाचे प्रश्नही निर्माण झाले. मात्र घरपट्टी-पाणीपट्टीच्या रूपाने मोठा महसूलही ग्रामपंचायतीला मिळू लागला. गावातील जागांचा व्यावसायिक कारणासाठी वापर वाढू लागला. सांगली शहराचा माधवनगरवर मोठा परिणाम झाला आणि सांगलीस पर्यायी बाजारपेठ म्हणून माधवनगरची ओळख निर्माण झाली. सांगली शहराबरोबरचा दर येथील जमिनीला मिळू लागला. कापड उद्योग, सोने-चांदी व्यावसायिक, व्यापारी वर्गाची गुंतवणूक झाल्याने येथील जागेचे भाव गगनाला भिडले. माधनगरात तयार कपडे खरेदीसाठी सांगलीबरोबरच आजुबाजुच्या ग्रामीण भागातून नागरीक मोठ्याप्रमाणात येत आहेत.
जुने वाडे, घरे पाडून टोलजंग इमारती, व्यापारी संकुले उभी राहू लागली. आकर्षक दुकान गाळे आणि शोरूमने गाव सजू लागले. कपडे, भांडी खरेदीसाठी आता सांगली शहरातील नागरिकही माधवनगरला गर्दी करत आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल सुरू झाली. महसूल वसुलीत वाढ झाल्याने ग्रामपंचायतही काही प्रमाणात विकास करू शकली. अनेक खासदार, आमदारांचा विकासनिधी गावास मिळू लागल्याने अंतर्गत रस्ते, गटारी, पेव्हिंग ब्लॉक यामुळे गावाचे रूपडे बदलले. हळूहळू माधवनगर गाव सांगली शहराचाच एक भाग बनले. (क्रमश:)
जकात चुकवण्यासाठी गोदामांचे बांधकाम
माधवनगर हे गाव सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका हद्दीत नाही. त्यामुळे सांगलीतील जकात चुकवण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी माधवनगरमध्ये गोदामे घेतली होती. त्यामुळे शहराबाहेर जकात वाचवून व्यापार सुरू होता. त्याचा फायदा माधवनगरला झाला. गोदामांमुळे येथील जागा भाड्याने देण्याचा व्यवसायच सुरू झाला. उत्पन्नाचे साधन मिळाले. त्याचबरोबर माधवनगरचा महापालिका हद्दीत समावेश करण्यासाठी महापालिका हद्दीतील व्यापाऱ्याबरोबरच माधवनगरमधील रहिवाशांचाही यासाठी नेहमी विरोधच राहिला आहे. महापालिका हद्दीत समावेश झाल्यास करवाढीची भीती येथील नागरिकांना आहे.