म्हैसाळ हत्याकांडाचा सूत्रधार मांत्रिक आब्बासला नऊ दिवसाची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 01:33 PM2022-07-01T13:33:49+5:302022-07-01T13:34:14+5:30
बागवान याची रुग्णालयातून सुटका होताच त्यास पोलिसांनी अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले. हत्याकांडाच्या चौकशीसाठी मांत्रिक बागवान याला नऊ दिवस पोलीस कोठडीचे आदेश न्यायलयाने दिले.
मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील सामूहिक हत्याकांडाचा सूत्रधार मांत्रिक आब्बास मोहंमदअली बागवान याची रुग्णालयातून सुटका होताच त्यास पोलिसांनी अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले. हत्याकांडाच्या चौकशीसाठी मांत्रिक बागवान याला नऊ दिवस पोलीस कोठडीचे आदेश न्यायलयाने दिले.
म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे व शिक्षक पोपट वनमोरे या बंधूंना गुप्तधनाच्या आमिषाने त्यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना विष पाजून हत्या केल्याप्रकरणी सोलापूर येथील मांत्रिक आब्बास बागवान व त्याचा साथीदार धीरज चंद्रकांत सुरवशे यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर आब्बास बागवान याने छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्याने त्यास तीन दिवस मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा साथीदार धीरज सुरवसे यास न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
उपचारानंतर मांत्रिक आब्बास बागवान याला गुरुवारी रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्यास मिरज न्यायालयात हजर केले. मांत्रिक बागवान हा हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याने त्याच्या संपूर्ण गुन्ह्याची उकल व हत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी नऊ दिवस कोठडी देण्याची न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालयाने मांत्रिक बागवान यास आठ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.
गुप्तधनासाठी किती पैसे उकळले?
मांत्रिक बागवान यास म्हैसाळ गावात घटनास्थळी नेऊन हत्याकांडांची माहिती घेण्यात येणार आहे. बागवान वनमोरे बंधूंच्या केव्हापासून संपर्कात होता, त्याने गुप्तधनासाठी किती पैसे उकळले, यापूर्वीही असे कृत्य केले आहे का, वनमोरे कुटुंबीयांच्या हत्येचे नेमके कारण काय, याची पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली.