महाहादग्यात ‘सखीं’ची धमाल
By admin | Published: October 12, 2015 11:50 PM2015-10-12T23:50:27+5:302015-10-13T00:26:36+5:30
‘लोकमत’तर्फे आयोजन : ज्योत्स्ना कुलकर्णी, सोनाली कांबळे, स्मिता ठोंबरे विजेत्या
इस्लामपूर : ‘एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, हातुका—मतुका, आज आहे सोमवार—महादेवाला नमस्कार...’ अशा एकापेक्षा एक सरस पारंपरिक हादग्याच्या गाण्यांचा ताल धरत सखींसह महिलांनी महाहादग्याचा फेर धरला. सोमवारी जवळपास चार तास रंगलेल्या या महाहादग्याच्या महोत्सवात महिलांनी धमाल केली. ज्योत्स्रा कुलकर्णी, सोनाली कांबळे व स्मिता ठोंबरे या स्पर्धेतील विजेत्या ठरल्या. त्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
‘लोकमत’ सखी मंच आणि कुसूमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा महाहादगा आणि विविध स्पर्धांचा उपक्रम जल्लोषात झाला. ‘कुसूमताई’च्या मैदानावर सखी व महिलांचा हा महाहादगा उत्तरोत्तर रंगत गेला. हादग्याची गाणी, लंगडी, संगीत खुर्ची अशा स्पर्धांच्या जोडीला महिलांनी धरलेला फुगडीचा फेर आणि घोडा नाचविण्याच्या खेळाचा मनमुराद आनंद सखींनी लुटला.
‘कुसूमताई’च्या मैदानावर शनिवारी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. लंगडी स्पर्धेच्या सहा फेऱ्या घेण्यात आल्या. अत्यंत चुरशीने ही स्पर्धा झाली. अंगातील चापल्य आणि दमाची क्षमता दाखविणाऱ्या या अस्सल देशी खेळांचा स्पर्धकांनी आनंद घेतला. तसेच संगीत खुर्ची स्पर्धेतही सहभागी स्पर्धकांनी धमाल केली.
शेवटी हादग्याच्या गाण्यांच्या माध्यमातून महिलांच्या गळ्यातील स्वर आणि नादमधुर गोडव्याने महाहादगा रंगत गेला. महिला—मुलींच्या सुरक्षेबाबत सजग करणारी कविता मनीषा बाबासाहेब कांबळे यांनी सादर केली. सखींनी त्याला दाद दिली.
सखी मंच संयोजिका सुनंदा पेटकर, प्रा. डॉ. सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थित सखी व महिलांना खिरापत वाटण्यात आली.
प्रा. बी. बी. भागवत, प्रा. डॉ. एस. जी. साळवे, प्रा. एस. जे. पाटील, प्रा. एन. एन. ठोंबरे, प्रा. शैलजा टिळे, प्रा. रेखा फसाले, प्रा. नयना वळीव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. तेजस्विनी डांगे—पाटील, प्रा. शैलजा यादव— पाटील, प्रा. स्वाती कुलकर्णी, प्रा. युवराज केंगार, प्रा. उज्ज्वला पाटील, प्रा. मनीषा माळी, राजेंद्र सावंत, राजन शिंदे, संजय पाटील, अरुण चांदणे यांनी विविध स्पर्धांचे संयोजन केले. (वार्ताहर)
स्पर्धेतील विजेत्या..!
हादगा गीते— ज्योत्स्रा कुलकर्णी (प्रथम), स्रेहा मोटे (द्वितीय). लंगडी— सोनाली कांबळे (प्रथम), श्रेया जाधव (द्वितीय). संगीत खुर्ची— स्मिता ठोंबरे (प्रथम), नीलम माळी (द्वितीय). स्पर्धेनंतर या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.