महाआघाडीत दिलजमाई, महायुतीतही सूर जुळले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:29 PM2019-04-09T23:29:52+5:302019-04-09T23:29:57+5:30
अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. ...
अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना असल्याने चुरस वाढली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला दोन्हीकडे असणारे मतभेद आता संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. आघाडीतील पक्षांची दिलजमाई होत असताना, महायुतीमध्येही आता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गायिले जात आहे. दोन्हीकडील एकसंधपणाचे दावे आता कितपत तग धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघ हा सांगली लोकसभा मतदार संघातील मोठ्या मतदारसंघांपैकी एक आहे. मतांबाबतीत हा तिसऱ्या क्रमांकावर येतो. शहरी मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक निवडणुकीत याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान होत असल्याने या मतदारसंघाकडे महाआघाडी आणि महायुतीचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात याठिकाणी दोन्ही बाजूंनी प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. प्रचाराचा सुरुवातीचा टप्पा दोन्हीकडील नाराजी दूर करण्यात व उमेदवारीच्या गोंधळातच गेला आहे. आता दिलजमाई झाली असली तरी, प्रचाराच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यात ती कितपत टिकणार आणि त्याचे काय परिणाम राहणार, यावरच सर्व अवलंबून आहे. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, जनता दल, भाजप, अपक्ष अशा प्रत्येकाला यश मिळाले आहे. सुरुवातीच्या सहा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते.
युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?
या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. आमदार आणि नगरसेवकांचे एकत्रित बळ मोठे आहे. शिवसेनेकडेही दिग्गज नेते आहेत. त्यामुळे ही ताकद एकवटल्याने भाजपला युती म्हणून याठिकाणी मोठा लाभ मिळू शकतो.
युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?
शिवसेनेत मोठी गटबाजी आहे. पदाधिकारी, नेत्यांमध्ये एकमत नाही. याशिवाय भाजपचे उमेदवार आणि येथील आमदारांत यापूर्वी मतभेद निर्माण झाले होते. त्याचा थोडाफार परिणाम येथे दिसू शकतो.
आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?
सांगली मतदारसंघात काँग्रेस व राष्टÑवादीची ताकद अधिक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सांगली शहरातीलच आहेत. दोन्ही काँग्रेसची एकवटलेली ताकद ‘स्वाभिमानी’ला उल्लेखनीय बळ देऊ शकते.
आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?
काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी, राष्टÑवादीबद्दल कायम व्यक्त केला जाणारा संशय यामुळे आघाडीत एकमेकांबद्दल विश्वास कमी दिसून येतो. आघाडीधर्म ठोकरून इतरांना छुपी रसद पुरविण्याची येथे परंपरा आहे.