महाडिक बंधू-राजवर्धन पाटील भेटीने चर्चेला उधाण -: विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:04 PM2019-06-14T23:04:30+5:302019-06-14T23:05:47+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीची हवा तापू लागली आहे. इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची दोन्ही मुले मतदारसंघात यापूर्वीच सक्रिय झाली आहेत. शुक्रवार, दि. १४ रोजी सकाळी आ. पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी
अशोक पाटील ।
इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीची हवा तापू लागली आहे. इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची दोन्ही मुले मतदारसंघात यापूर्वीच सक्रिय झाली आहेत. शुक्रवार, दि. १४ रोजी सकाळी आ. पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी पेठनाक्यावर जाऊन राहुल महाडिक व सम्राट महाडिक या बंधूंची सांत्वनपर भेट घेतली. मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे.
इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांनी संपर्क वाढवला आहे. ग्रामीण भागातील बुथ कमिट्या सक्षम करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते तळागाळातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. प्रदेशाध्यक्षपद असल्याने त्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. निवडणुकीत त्यांना स्वत:च्या मतदारसंघात वेळ देता येणार नाही. यासाठी त्यांनी आता वेळ मिळेल तसे मतदारसंघातील महत्त्वाच्या गावांना भेटी देण्यावर भर दिला आहे. प्रत्येक गावात प्रभागनिहाय १२ बैठका ते घेत आहेत.
सामाजिक, सांस्कृतिक व इतर सुख-दु:खांच्या प्रसंगात सहभागी होण्याची जबाबदारी आ. पाटील यांनी प्रतीक व राजवर्धन पाटील या दोन्ही मुलांवर सोपवली आहे. याच भूमिकेतून राजवर्धन यांनी शुक्रवारी सकाळी पेठनाक्यावरील ‘सम्राट’ या निवासस्थानी जाऊन महाडिक बंधूंची भेट घेतली. नानासाहेब महाडिक यांच्या निधनानंतर महाडिक कुटुंबीयांची भेट घेता आली नव्हती, त्यामुळे आता भेटल्याचे राजवर्धन यांनी सांगितले. या तिघांनी मिळून तब्बल दीड तासाहून अधिक वेळ एकत्र घालवला. यामुळे ही भेट नेमकी भावपूर्णच होती, की याला राजकीय रंग होता, या चर्चेला ऊत आला आहे.
इस्लामपूर मतदारसंघात महाडिक गटाची भूमिका महत्त्वाची आहे. शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक यांनी शड्डू ठोकला आहे. या मतदारसंघातील ४९ गावांमध्ये आमदार पाटील यांचा गट भक्कम आहे. त्यामुळे या भेटीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
आंब्याची पेटी भेट
नानासाहेब महाडिक यांनी फोंडा येथे मोठ्या प्रमाणात फळझाडे लावली आहेत. विविध जातीच्या आंब्याची झाडेही आहेत. त्यामुळेच महाडिक यांना वनश्री पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या स्मरणार्थ महाडिक बंधूंनी राजवर्धन पाटील यांना आंब्याची पेटी भेट दिली.
नानासाहेब महाडिक यांच्या निधनानंतर काही कारणांमुळे महाडिक कुटुंबीयांची भेट घेता आली नाही. आजच्या भेटीला कोणताही राजकीय रंग नाही. सांत्वन आणि फक्त ओळख व्हावी, यासाठीच आपण महाडिक यांच्या निवासस्थानी गेलो होतो.
- राजवर्धन पाटील.
नानासाहेब महाडिक यांच्या निधनानंतर राज्यासह जिल्ह्यातील अनेकांनी आमच्या भेटी घेतल्या आहेत. यानिमित्ताने राजवर्धनही भेटण्यास आले होते. दीड तासाहून अधिक वेळ आमच्या निवासस्थानी ते होते. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसली तरी, आपापल्या जीवनातील विविध पैलूंवर बोलणे झाले.
- सम्राट महाडिक