विधानसभेसाठी महाडिक बंधूंना भाजपच्या दोन मंत्र्यांचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:30 PM2019-06-24T23:30:28+5:302019-06-24T23:31:52+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठनाक्यावरील राहुल आणि सम्राट या महाडिक बंधूंना चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडे या भाजपच्या दोन मंत्र्यांनी ताकद देण्याचा मानस जाहीर केला आहे. तलवार देऊन नेत्यांचा सत्कार
अशोक पाटील ।
इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठनाक्यावरील राहुल आणि सम्राट या महाडिक बंधूंना चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडे या भाजपच्या दोन मंत्र्यांनी ताकद देण्याचा मानस जाहीर केला आहे. तलवार देऊन नेत्यांचा सत्कार करणाऱ्या महाडिक गटाची तलवार धारदार करण्यासाठी भाजपने पावले उचलली आहेत. त्यामुळे महाडिक यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिवंगत नेते नानासाहेब महाडिक यांनी वसंतदादा पाटील आणि त्यांचे नातू प्रतीक पाटील, राजारामबापू पाटील आणि त्यांचे पुत्र जयंत पाटील, पतंगराव कदम आणि त्यांचे पुत्र विश्वजित कदम, नारायण राणे आणि त्यांची मुले नीलेश व नीतेश यांच्यासह काँग्रेस-राष्टÑवादीमधील दिग्गज नेत्यांचा त्या-त्यावेळी पेठनाक्यावर तलवार देऊन सत्कार केला होता. त्यावेळी या नेत्यांनी नानासाहेब महाडिक यांना आमदारकीची स्वप्ने दाखवली, पण ती स्वप्ने प्रत्यक्षात कधीच उतरली नाहीत. काँग्रेस-राष्टÑवादीने कोणतीच आश्वासने पाळली नसल्याने महाडिक यांना स्थानिक स्वराज्य संस्था गटामधून विधानपरिषदेसाठी दोनवेळा बंडखोरी करावी लागली. तेव्हापासून नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या राहुल व सम्राट या दोन्ही पुत्रांनी सर्वच पक्षांना समान अंतरावर ठेवून गटाची बांधणी केली.
हा गट वाळवा-शिराळा तालुक्यात प्रभावशाली आहे. काँग्रेसनंतर राज्यातील युती सरकारने पाच वर्षे महाडिक गटाला खेळवत ठेवले. त्यामुळे सम्राट यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदार नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाशी जवळीक वाढवली, मात्र कोल्हापूर येथील महाडिक कुटुंबियांच्या राजकीय भूमिकेचा परिणाम पेठनाक्यावरील महाडिक गटाच्या वाटचालीवर झाला. त्यामुळे महाडिक बंधू आता भाजपमधील महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क ठेवून आहेत.
राहुल यांनी तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही संपर्क वाढवला आहे. या सर्व नेत्यांचा पेठनाक्यावर तलवार देऊन सत्कार करण्यात आला आहे. आता नव्याने झालेले भाजपचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांचाही सत्कार करण्यात आला. त्यावेळी खाडे यांनी, महाडिक बंधूंना ताकद देऊ, असे जाहीर केले.
या सर्वच नेत्यांनी त्या-त्यावेळी दिलेली आश्वासने वाळवा आणि शिराळा तालुक्यात चर्चेला आली आहेत. ती विधानसभा निवडणुकीवेळी पाळली जाणार, की हवेत विरली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पेठनाक्यावर आलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याचा यथायोग्य सत्कार करणे, ही परंपरा नानासाहेब महाडिक यांनी सुरू केली. नंतर ती जपलीही. तीच परंपरा आम्ही आगामी काळातही जपणार आहोत.
- राहुल महाडिक, सचिव, नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल