सांगली जिल्हा परिषदेत महाआघाडी पराभूत, भाजपच्या प्राजक्ता कोरे नव्या अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 04:43 PM2020-01-02T16:43:27+5:302020-01-02T16:49:38+5:30
सांगली जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता कायम राहिली असून भाजप आघाडी सत्तेवर आली आहे. म्हैसाळ ता. मिरज येथील प्राजक्ता कोरे या विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदासाठी मिरज तालुक्यातील कवलापूर गटाचे सदस्य शिवाजी डोंगरे विजयी झाले. महाआघाडीच्या सदस्यांना पराभव पत्करावा लागला.
सांगली : सांगली जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता कायम राहिली असून भाजप आघाडी सत्तेवर आली आहे. म्हैसाळ ता. मिरज येथील प्राजक्ता कोरे या विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदासाठी मिरज तालुक्यातील कवलापूर गटाचे सदस्य शिवाजी डोंगरे विजयी झाले. महाआघाडीच्या सदस्यांना पराभव पत्करावा लागला.
अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्राजक्ता कोरे तर उपाध्यक्षपदासाठी शिवाजी डोंगरे यांचा अर्ज दाखल झाला तर महाविकास आघाडीकडून मांगले येथील अश्विनी नाईक यांचा अध्यक्षपदासाठी तर बोरगावचे जितेंद्र पाटील यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. भाजपला ३५ तर काँग्रेसच्या महाविकास आघाडीला २२ मते मिळाली. त्यामुळे अध्यक्ष म्हणून भाजपच्या प्राजक्ता कोरे आणि उपाध्यक्षपदासाठी शिवाजी डोंगरे हे विजयी झाले.
जिल्हा परिषदेत अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. सध्या भाजपचे चिन्हावरील २४ आणि अपक्ष दोन अशी २६ सदस्य संख्या आहे. राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रयत विकास आघाडीचे चार सदस्य भाजपबरोबरच राहिले.
जगन्नाथ माळी (पेठ, ता. वाळवा) आणि निजाम मुलाणी (येलूर, ता. वाळवा) हे भाजपबरोबर राहिले. त्यामुळे भाजपकडे २८ सदस्यांचे संख्याबळ होते. माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि शिवसेनेचे तीन सदस्यही भाजपसोबत राहिल्याने भाजप आघाडीला विजय मिळाला.
खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाचे चार सदस्य सहलीमध्ये सहभागी झाले नसल्यामुळे भाजपकडे महाडिक गटासह २४ सदस्य राहतील अशी अपेक्षा होती. पण खा. पाटील यांचीही नाराजी दूर करण्यात भाजप नेतृत्वाला यश आले.