४९ वर्षांचा अखंड प्रवास, ११ मे १९७१ ला पहिल्यांदा धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:01 PM2020-05-26T18:01:33+5:302020-05-26T18:05:00+5:30
कोल्हापूर आणि मिरजेत इंजिन वळवण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागे. सुटे इंजिन एका विहिरीसदृश खड्ड्यावर थांबवून मोटर किंवा कर्मचाºयांच्या ताकदीने १८० अंशात फिरवले जायचे. कोल्हापूर स्थानकात अजूनही हा खड्डा दिसतो.
संतोष भिसे।
सांगली : पश्चिम महाराष्ट्राची विकासवाहिनी ठरलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने ११ मेरोजी अखंड प्रवासाची ४९ वर्षे पूर्ण केली. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरदरम्यान लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवणाऱ्या महालक्ष्मीचा सुवर्णमहोत्सवी प्रवास सुरू झाला आहे. प्रवाशांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि मध्य रेल्वेला अभिमानाची असणारी ‘महालक्ष्मी’ पश्चिम महाराष्ट्रासाठी जणू विकासवाहिनीच ठरली आहे.
मिरज-कोल्हापूर लोहमार्गाच्या ब्रॉडगेजनंतर ११ मे १९७१ रोजी महालक्ष्मी एक्स्प्रेस पहिल्यांदा धावली. त्यावेळी स्लिपरबर्थ नसल्याने प्रथम श्रेणीच्या डब्यातच बर्थवर झोपावे लागायचे. आसने लाकडाची आणि इंजिन कोळशाचे होते. कºहाड आणि वाठारमध्ये कोळसा व पाण्यासाठी थांबा घ्यावा लागायचा. संध्याकाळी पाच वाजता कोल्हापुरातून निघून मुंबईत त्यावेळच्या व्हिक्टोरिया टर्मिनसला दुसºयादिवशी दुपारी साडेबाराला पोहोचायची. कोल्हापूर आणि मिरजेत इंजिन वळवण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागे. सुटे इंजिन एका विहिरीसदृश खड्ड्यावर थांबवून मोटर किंवा कर्मचाºयांच्या ताकदीने १८० अंशात फिरवले जायचे. कोल्हापूर स्थानकात अजूनही हा खड्डा दिसतो.
ही गाडी हुबळी विभागाकडून मुंबईला ३०४ व परतताना ३०३ क्रमांकासह धावायची. कालांतराने क्रमांक ७४११ व ७४१२, १०११ आणि १०१२ झाले. सध्या १७४११ व १७४१२ असा या एक्स्प्रेसचा क्रमांक आहे. सत्तरच्या दशकात बेंगलोरहून थेट मुंबईला पुरेशा गाड्या नव्हत्या. कर्नाटकातील प्रवासी हुबळी-मिरज पॅसेंजरने मिरजेत येऊन पुढे महालक्ष्मीमधून मुंबईला जायचे.
कोल्हापूर-सांगलीकरांसाठी महालक्ष्मी अभिमानाची. महालक्ष्मीने मुंबईला जाणे हा जणू विमानप्रवासाचा अनुभव असे. काळ बदलला तरी महालक्ष्मीची ‘क्रेझ’ कायम आहे. बाराही महिने तिचे आरक्षण फुल्ल असते. अत्यंत किरकोळ दुर्घटनांचा अपवाद करता ती अखंड धावत आहे. आजवर कोट्यवधींचे उत्पन्न महालक्ष्मी एक्स्प्रेसने रेल्वेला मिळवून दिले आहे.
महालक्ष्मी-तिरुपतीचा भावनिक बंध
महालक्ष्मी एक्स्प्रेसला हरिप्रियाचे कनेक्शन दिल्याने महालक्ष्मी-बालाजीचा भावनिक बंधही तयार झाला आहे. मुंबईहून येणारी महालक्ष्मी दुपारी हरिप्रिया एक्स्प्रेस म्हणून तिरुपतीला निघते.
वायंगणीची दुर्घटना
गतवर्षी २७ जुलै २०१९ रोजी बदलापूरजवळ वायंगणी येथे उल्हास नदीच्या महापुरात महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकून पडली होती. हवाई दलाच्या मदतीने आॅपरेशन महालक्ष्मी राबविण्यात आले. महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या इतिहासात ही दुर्घटना कधीही न विसरण्यासारखी आहे.
कोट्यवधींचे उत्पन्न दिले
कोल्हापूर-सांगलीकरांसाठी महालक्ष्मी अभिमानाची. ठरली आहे. आजवर कोट्यवधींचे उत्पन्न रेल्वेला मिळवून दिले आहे.
उद्घाटन : ११ मे १९७१
प्रवास : ५१८ कि.मी.
वेळ : १०.५७ तास
क्रमांक : १७४११, येताना १८ थांबे
क्रमांक : १७४१२, जाताना १९ थांबे
सरासरी गती : ४७.३८ कि.मी./प्रति तास
कमाल गती : ११० कि.मी./प्रति तास