Sangli: धर्मगिरीत महामस्तकाभिषेक सोहळ्याने सांगता, पंचकल्याणक महामहोत्सवात हजारो श्रावक-श्राविकांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 02:00 PM2024-02-03T14:00:42+5:302024-02-03T14:02:00+5:30
वाटेगाव : जैन तीर्थक्षेत्र धर्मगिरी येथे भगवान १००८ श्री आदिनाथ, भगवान भरत, भगवान बाहुबली, भगवान संभवनाथ या जिनाबिंबांचे महामस्तकाभिषेक ...
वाटेगाव : जैन तीर्थक्षेत्र धर्मगिरी येथे भगवान १००८ श्री आदिनाथ, भगवान भरत, भगवान बाहुबली, भगवान संभवनाथ या जिनाबिंबांचे महामस्तकाभिषेक सोहळा हजारो श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत झाला.
श्रीमज्जिनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव (धर्मगिरी, ता. शिराळा) येथील पंचकल्याणकमध्ये आचार्य वर्धमान सागर महाराज, १०८ धर्मसागर महाराज, १०८ विद्यासागर महाराज, १०८ सिद्धांत सागर महाराज, सर्व मुनी संघ यांच्या मार्गदर्शनाखाली णमोकार मंत्राच्या उच्चारात विश्वशांती महायाग आराधना, जिनाबिंब स्थापना कार्यक्रम उत्साहात झाले.
महामस्तकाभिषेकांच्या सवालामध्ये भगवान आदिनाथांचा सवाल सतीश होरे, कल्पना होरे (वाळवा) भगवान भरत यांचा सवाल अक्षय जैन, कमलेश जैन (गुणा), भगवान बाहुबली यांचा सवाल शोभा बर्डे, पद्मश्री बर्डे यांना मिळाला. या सर्व कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न झाला.
रथोत्सवाचा सवाल धर्मगिरीक्षेत्राचे माजी अध्यक्ष रवींद्र बर्डे यांच्या कुटुंबाला मिळाला. माजी खासदार राजू शेट्टी, विजय राजमाने यांनी भेट दिली. सायंकाळी वाटेगावमधून सवालधारकांची हत्ती, घोडे, चार रथातून गावातील प्रमुख मार्गावरून सहवाद्य मिरवणूक काढून पंचकल्याणक उत्सवाची सांगता करण्यात आली.
पंचकल्याणक महोत्सव आचार्य वर्धमान सागर, आचार्य चंद्रप्रभ, अध्यक्ष माणिक शेटे, उपाध्यक्ष विश्वास पाटील, आजी माजी विश्वस्त, धर्मगिरी कार्यक्षेत्रातील २५ गावातील ग्रामस्थ, सर्व वीर सेवा दल यांनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.