जगद्गुरू चारूकिर्ती भट्टारक महास्वामी यांचे महानिर्वाण, अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची गर्दी
By अविनाश कोळी | Published: March 23, 2023 05:24 PM2023-03-23T17:24:28+5:302023-03-23T17:25:10+5:30
जगप्रसिद्ध भगवान बाहुबली श्रीक्षेत्र श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील जैन मठाचे प्रमुख
सांगली : जगप्रसिद्ध भगवान बाहुबली श्रीक्षेत्र श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील जैन मठाचे प्रमुख जगद्गुरू स्वस्तीश्री चारूकिर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी (७४) यांचे गुरुवारी पहाटे श्रवणबेळगोळ येथे निधन झाले. देशभरातील शिष्यगण, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या अंत्ययात्रेवेळी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
भट्टारक स्वामींचा जन्म ३ मे १९४९ रोजी कर्नाटकातील वारंगा येथे झाला होता. त्यांचे पूर्वीचे नाव रत्नवर्मा होते. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी श्रवणबेळगोळ मठाचे उत्तराधिकारी म्हणून तत्कालीन भट्टारक भट्टाकलंक स्वामी यांनी १९ एप्रिल १९७० रोजी त्यांची निवड केली. त्यांनी जैन दर्शन तसेच षडदर्शन इतिहास तंत्र, मंत्र याबरोबरच विविध भाषांचे ज्ञान मिळवले. ते श्रवणबेळगोळचे भट्टारक झाले तेव्हा मठात अवघी काही हजार रुपयांची संपत्ती होती. सध्या मठ दरवर्षी दानधर्म, शिक्षण, आरोग्य, धार्मिक-उन्नती यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली १९८१, १९९३, २००६ आणि २०१८ या चार वर्षांत गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा भव्य स्वरूपात झाला. या महामस्तकाभिषेकास आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांचे योगदान होते. महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व भट्टारक शिष्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. १९८१ मध्ये तत्कालीन दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना ‘कर्मयोगी’ ही पदवी प्रदान केली होती. भट्टारक पदावर जवळपास ५४ वर्षे असूनही त्यांना संयमी जीवनासाठी आणि विनम्र वागणुकीसाठी ओळखले जात होते.
२०१९ च्या महापुरामध्ये त्यांनी सांगली, कोल्हापूर, बेळगाव, बागलकोट या जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त भागाला भेटी देऊन सांगली, कोल्हापूर व बेळगाव या जिल्ह्यांना प्रत्येकी ३५ लाखाचा मदतनिधी दिला होता.
देशभरातील मान्यवरांची गर्दी
श्रवणबेळगोळ येथे गुरुवारी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी कर्नाटक, महाराष्ट्रासह देशभरातील शिष्यगण तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती.
धर्मचंद्र अनंतात विलीन
विंध्यगिरीचा विचारवंत संत, सातासमुद्रापार जैन धर्म तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारा धर्मचंद्र अनंतात विलीन झाला. सांगलीवर त्यांचे विशेष प्रेम होते. येथील राजमती ट्रस्ट, राजमती भवन यांच्या सर्व सामाजिक कार्यात त्यांचा आशीर्वाद नेहमीच लाभला. त्यांच्या निधनाने दिगंबर जैन समाजासह संपूर्ण भारताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशी भावना श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्र कमिटीचे विश्वस्थ सुरेश पाटील यांनी व्यक्त केली.