महांकाली कारखान्याच्या जमीन व्रिकीचा करार रद्द, सांगली जिल्हा बँकेची कारवाई
By अविनाश कोळी | Published: November 4, 2023 06:59 PM2023-11-04T18:59:37+5:302023-11-04T19:00:26+5:30
कर्जाची परतफेड नसल्याने निर्णय
सांगली : कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याने जिल्हा बॅँकेच्या कर्जाची मुदतीत परत फेड न केल्याने कारखाना व विकसक कंपनीशी जमीन विक्रीबाबतचा केलेला करार बॅँकेने रद्द केला. जिल्हा बँकच आता जमीन विक्री करून कर्जाची वसुली करणार आहेत. त्यासाठी अन्य एका एजन्सीबरोबर चर्चा सुरू केली आहे.
महांकाली साखर कारखाना जिल्हा बॅँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन ॲक्टअंतर्गत ताब्यात घेतला आहे. या कारखान्याचा बॅँकेने दोन वेळा लिलावही लावला. मात्र, या विरोधात कारखान्याच्या संचालकांनी ऋण वसुली प्राधिकरण (डीआरटी) मध्ये धाव घेत स्थगिती मिळवली. दरम्यान, कारखान्याने ८० एकर जमीन विक्री करून कर्ज परतफेड करण्याचा प्रस्ताव जिल्हा बॅँकेला सादर केला. बॅँकेने तो सुरुवातीला फेटाळून लावला. कारखान्याने हाच प्रस्ताव डीआरटीमध्ये सादर केला. डीआरटीमध्ये सुनावणी झाल्यावर कारखान्याच्या बाजूने निकाल लागला.
कारखाना व जिल्हा बॅँकेत चर्चा झाल्यानंतर जमीन विक्री करून कर्ज पतरफेड करण्यास बॅँकेने सशर्त मान्यता दिली होती. याबाबत कारखाना, जिल्हा बॅँक व जमीन विक्री करणाऱ्या शिवलॅण्ड कंपनीत त्रिस्तरीय करार झाला होता. या कारारानुसार कारखान्याच्या कर्जाला बॅँकेने ओटीएस मंजूर केले. पण ओटीएस नंतर होणारी कर्जाची रक्कम तीन ते चार हप्त्यात सप्टेंबर २०२३ पर्यंत भरण्याची मुख्य अट कारखाना व कंपनीला घालण्यात आली होती.
महांकाली साखर कारखाना व शिवलॅण्ड कपंनीला जिल्हा बॅँकेने थकीत कर्जाचे हप्ते पाडून दिले होते. सुमारे १४० कोटींचे कर्ज ओटीएसनंतर १०९ कोटींवर आले. यातील ५ ते ६ कोटी रुपये कारखान्याने जानेवारीत भरले. मात्र त्यानंतर मार्च २३ अखेर एकही रुपया भरला नाही. यानंतर बॅँकेने कारखान्याला वारंवार सूचना देऊनही करारानुसार कर्जाची रक्कम परतफेड केली नाही. त्यामुळे बॅँकेने ऑगस्टमध्ये महांकाली कारखान्याच्या कर्जाला दिलेले ओटीएस रद्द केले.
महांकाली कारखान्याला कल्पना : मानसिंगराव नाईक
महांकाली साखर कारखाना चालू व्हावा म्हणून बँकेनेही सकारात्मक पाऊल टाकले होते. बॅँकेने सर्व प्रकारची मदत कारखान्यास केली. मात्र कारखाना करारानुसार मुदतीत कर्ज परत फेड करण्यास अपयशी ठरला. त्यामुळे सदरचा करार रद्द करण्यात आल्याचे कारखान्याला कळवले आहे. कोणत्याही स्थितीत मार्च २४ अखेर या कारखान्याकडील जिल्हा बॅँकेची थकबाकी वसूल केली जाईल, असे बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.