जिल्ह्यातील महापुराचा विळखा होतोय सैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:27 AM2021-07-27T04:27:17+5:302021-07-27T04:27:17+5:30

२६०७२०२१-एसएएन-०१ :सांगलीतील स्टेशन रोडवरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी याठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले. (छाया : नंदकिशाेर ...

Mahapura in the district is getting loose | जिल्ह्यातील महापुराचा विळखा होतोय सैल

जिल्ह्यातील महापुराचा विळखा होतोय सैल

Next

२६०७२०२१-एसएएन-०१ :सांगलीतील स्टेशन रोडवरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी याठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले. (छाया : नंदकिशाेर वाघमारे, सुरेंद्र दुपटे )

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचा विळखा आता सैल होत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी चोवीस तासात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत साडे तीन फुटांनी घट झाली आहे. महापूर ओसरत असल्याने पाचही तालुक्यांतील अनेक रस्ते, पूल व नागरी वस्त्या पाण्यातून मुक्त होत आहेत.

जिल्ह्यात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव या तालुक्यांमध्ये कृष्णा व वारणा नद्यांच्या महापुराने हजारो नागरिकांना ग्रासले आहे. पुरामुळे दोन लाखांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाणी ओसरत असतानाही अद्याप स्थलांतराचे काम सुरुच आहे.

धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयनेतून सध्या ३२ हजार ७४९ तर वारणा धरणातून १७ हजार ४४० क्युसेक विसर्ग सुरु आहे. अलमट्टीतूनही ३ लाख क्युसेकने विसर्ग सुरु असल्याने नदीपात्रातील पाणी आता ओसरत आहे. येत्या दोन दिवसात महापूर ओसरुन जनजीवन पूर्वपदावर येण्याचा अंदाज आहे. महापूर ओसरण्याची गती वाढण्याची प्रतीक्षा नदीकाठच्या नागरिकांना व प्रशासनाला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सध्या पाणी पातळीकडे लागले आहे.

सांगलीत रविवारी सायंकाळी सहा वाजता वाजता ५४.५ फूट इतकी कृष्णा नदीची पाणीपातळी होती. सोमवारी सायंकाळी ६ वाजता ती ५१.१० फुटापर्यंत खाली आली. सांगलीप्रमाणेच बहे, ताकारी, भिलवडी, अंकली, म्हैसाळ याठिकाणच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. सांगलीत दुपारी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. याशिवाय जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडिप होती. धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊसही कमी झाला आहे.

चौकट

सांगलीतील बचावकार्य सुरुच

सांगली शहरात सलग चौथ्या दिवशी बचावकार्य सुरु होते. अजूनही महापुरात अनेक लोक अडकले आहेत. महापूर ओसरत असला तरी पुरामुळे वीज व पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना आहेत त्या घरांमध्ये राहणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे लोक बाहेर पडत आहेत.

चौकट

शहरातील हे भाग झाले रिकामे

स्टेशन चौक, आमराई परिसरातील महापुराचे पाणी ओसरले असून बायपास रस्ता, रतनशीनगर तसेच कोल्हापूर रोडवरील महापुराचे पाणी काही फुटांनी कमी झाले आहे.

मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाल्याने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी संपर्कासाठी अडचणी आल्या. पुरात अडकलेल्या लोकांना बचाव पथकांना संपर्क साधता येत नव्हता. प्रशासकीय समन्वयातही त्यामुळे अडचणी आल्या.

चौकट

शहरात टँकरने पाणी पुरवठा

सांगलीतील जॅकवेल पाण्यात बुडाल्याने शहराचा पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरु आहे. महापालिकेने अनेक भागात सोमवारी टँकरने पाणी पुरवठा केला.

Web Title: Mahapura in the district is getting loose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.