सांगली जिल्ह्यात महापुराची मगरमिठी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:25+5:302021-07-26T04:25:25+5:30
सांगली : जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाने विश्रांती घेतली तरी वारणा, कृष्णा नदीच्या महापुराचा विळखा अद्याप कायम आहे. महापुराच्या ...
सांगली : जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाने विश्रांती घेतली तरी वारणा, कृष्णा नदीच्या महापुराचा विळखा अद्याप कायम आहे. महापुराच्या कचाट्यात हजारो लोक अडकले असल्याने त्यांच्या बचावकार्यासाठी लष्करी जवान, सामाजिक संघटनांनी प्रयत्न चालविले आहेत. रविवारीही जिल्ह्यात पावसाने दिवसभर उघडीप दिली होती, तरीही महापुराने निर्माण झालेले चिंतेचे ढग कायम आहेत.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात कृष्णा व वारणा नदीच्या पाणीपात्रात काहीठिकाणी घट तर काहीठिकाणी वाढ झाली आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी बारा तासात ५२ फुटांवरुन ५५ फुटांपर्यंत गेली. त्यामुळे गावठाणासह शहराच्या अनेक उपनगरांमध्ये पाणी शिरले. सांगलीसह सांगलीवाडी, हरीपूर, मिरज, अंकली याठिकाणच्या पाणी पातळीतही रविवारी दुपारपर्यंत वाढ झाली होती. त्यामुळे अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. अद्याप हजारो लोक महापुराच्या कचाट्यात सापडले असून, त्यांच्या सुटकेसाठी जवानांमार्फत रविवारी दिवसभर बचावकार्य सुरु होते.
वारणा धरणातील विसर्ग रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत ८ हजार ७२० क्युसेकने तर कोयनेतून ३१ हजार ३३२ क्युसेकने विसर्ग सुरु होता. विसर्ग कमी झाल्याने रविवारी रात्रीपासून नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरण्यास सुरुवात झाली.
लोकांचे स्थलांतर रविवारी तिसऱ्या दिवशीही सुरुच होते. आजपर्यंत दीड लाखांवर लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांची सोय निवारा केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय संघटनांकडून त्यांना मदतीचा हात दिला जात आहे.
चौकट
धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप
कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत पावसाची उघडझाप सुरु आहे. कधी अतिवृष्टी तर कधी पूर्ण उघडीप असे चित्र दिसत आहे. तरीही सलग पाऊस नसल्याने पुराच्या तीव्रतेचा धोका कमी झाला आहे.
चौकट
सांगलीचे गणपती मंदिर पाण्यात
सांगलीतील गणपती मंदिरात २०१९मध्ये महापुराचे पाणी शिरले होते. रविवारी सांगलीतील नदीपातळी ५४ फुटांवर गेल्यानंतर मंदिरात पाणी शिरले.
चौकट
सांगलीतील हे भाग पाण्यात
गणपती पेठ, गणपती मंदिर, राजवाडा परिसर, स्टेशन रोड, स्टेशन चौक, एस. टी. स्टँड, सांगलीवाडी, गावभाग, इंद्रप्रस्थ नगर, आमराई, वखारभाग, माधव नगर रोडवरील शासकीय विश्रामगृह, राम नगर, मीरा हाऊसिंग सोसायटी आदी भागात रविवारी पाणी शिरले.
चौकट
पाचही तालुक्यांत पूरस्थिती
वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यांमधील पूरस्थिती अद्याप कायम आहे. वारणा व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत हळूहळू घसरण होत आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार आहे.
चौकट
सांगलीत महापूर ओसरु लागला
सांगलीत दिवसभरात पाणीपातळी ५५ फुटांवर जाऊन सायंकाळी सहा वाजता दोन इंचाने कमी झाली. महापूर ओसरु लागला असला तरी त्याची गती अत्यंत कमी आहे.