लढाई राेहित पाटील यांच्या भवितव्याची; संजयकाकांच्या अस्तित्वाची
By हणमंत पाटील | Published: November 8, 2024 06:08 AM2024-11-08T06:08:46+5:302024-11-08T06:09:25+5:30
Maharashtra Assembly Election 2024: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व आमदार सुमनताई पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी, तसेच भाजपचे माजी खासदार व अजित पवार गटाचे उमेदवार संजय पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सुरू आहे.
- हणमंत पाटील
सांगली - दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व आमदार सुमनताई पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी, तसेच भाजपचे माजी खासदार व अजित पवार गटाचे उमेदवार संजय पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव व कवठेमहांकाळ या दोन दुष्काळी तालुक्यांच्या विधानसभा मतदारसंघात आता टेंभू, म्हैसाळ व आरफळ योजनेचे पाणी आले. आता या योजनांच्या श्रेयाचे राजकारण सुरू आहे. तसेच, भाजपचे संजय पाटील यांनी ऐनवेळी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी घेतली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी त्यांच्यामागे ताकद लावली आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी रोहित पाटील यांना पाठबळ दिले. त्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी होणारी लढत लक्षवेधी ठरली आहे.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे...
- जगभर प्रसिद्ध असलेली तासगावची द्राक्षे निर्यात होतात. परंतु, या भागात द्राक्ष निर्यात केंद्र व पॅक हाऊस नाही. तसेच, शासनाने द्राक्षातील रासायनिक अंश (रेसेड्यू), माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा या भागात सुरू केलेली नाही.
- मतदारसंघातील अलकूड-मणेराजुरी एमआयडीसीला कागदोपत्री मंजुरी मिळाली आहे. परंतु, त्याची अंमलबाजवणी व उभारणी करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून मिळालेला नाही.
- रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे शासनाचा मेंढी फार्म प्रकल्प आहे. परंतु, त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने हा प्रकल्प दुर्लक्षित आहे.
- द्राक्ष, भाजीपाला, डाळिंब व ऊस ही नगदी पिके आहेत. परंतु, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व कारखाने बंद पडलेले असल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला.