"प्रकल्प गुजरातला गेले तरी त्रिकुट बोलत नाही कारण..."; इस्लामपुरातून जयंत पाटलांची महायुतीवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:05 PM2024-11-05T19:05:53+5:302024-11-05T19:09:29+5:30
गेली ३५ वर्षे इस्लामपूरचे आमदार असलेल्या जयंत पाटील यांना रोखण्यासाठी अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
Islampur Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपमधून राष्ट्रवादी पक्षात आलेले निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन अजित पवार यांनी खेळी केली आहे. गेली ३५ वर्षे इस्लामपूरचे आमदार असलेल्या जयंत पाटील यांना रोखण्यासाठी अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली. निशिकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. फूट पाडायला हा माणूस तरबेज असल्याचे म्हणत अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच महाराष्ट्राची घसरलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचे काम आम्ही करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
इस्लामपूर मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने निशिकांत पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. त्यानंतर निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश उमेदवारी मिळवली होती. उमेदवारी अर्ज भरण्याआधी घेतलेल्या सभेत अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. फूट पाडण्यात समोरचा माणूस तरबेज आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीही सोशल मिडिया पोस्टमधून भाष्य केलं आहे.
"एक नेते येथे येऊन गेले आणि ते म्हणाले की पेठेपासून सांगलीचा रस्ता यांना करता आला नाही. २०१६ पासून हा रस्ता केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे ही जबाबदारी केंद्र सरकारमध्ये बसलेल्या पक्षाची आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते हा रस्ताच करत आहेत. गडकरी साहेबांना मी यापूर्वी देखील विनंती केली आहे. आता या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर टोल लागू नये हा माझा आग्रह होता. आता मात्र या मार्गावर टोल लागणार आहे. थोडा विरोध झाल्याशिवाय आपलाही कामाचा स्पीड वाढत नाही. आज महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पन्नात गुजरातपेक्षाही मागे गेले आहे. असंख्य प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले. मात्र हे त्रिकुट काही बोलत नाही. कारण यांच्या डोक्यावर टांगत्या तलवारी आहेत. मतदारांना विकत घेण्याची मानसिकता यांची आहे. मात्र तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने उद्याचे सरकार हे महाविकास आघाडीचे असेल. महाराष्ट्राची घसरलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचे काम आम्ही करू," असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
"यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार निशिकांत पाटील यांना संधी द्या. आपण या तालुक्याला बारामतीपेक्षा चांगले बनवू. राजारामबापूंनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये नंतर जयंत पाटील यांनी काय केलं? संस्था योग्य पद्धतीने वाढवल्या का? असला मुख्यमंत्री करायचा का? करेक्ट कार्यक्रम करायचा त्यांच्या हातात नाही. ते जनतेच्या हातात आहे. करेक्ट कार्यक्रम करून लोकांचं भलं होत नाही," अशी टीका अजित पवारांनी केलं होतं.