"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 10:50 AM2024-11-08T10:50:49+5:302024-11-08T10:56:44+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : जयंत पाटील म्हणाले, विशाल पाटील, तुम्ही अपक्ष उमेदवारीच्या नादाला लागण्याऐवजी तुतारीच्या नादाला लागला असता, तर तुमचे मताधिक्य आणखीन दीड लाखाने वाढले असते.
Maharashtra Assembly Election 2024 : मिरज : मिरजेत महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत गुरुवारी 'घड्याळ' चिन्हावरून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी रंगली. मिरजेतील प्रचारसभेत दोन्ही नेत्यांसह उद्धवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील, काँग्रेस नेते मोहन वनखंडे यांच्यासह महाआघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंत पाटील यांचे आगमन उशिरा झाले. ते येण्यापूर्वीच विशाल पाटील यांनी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्याने मिरजेतील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते नाराज झाले. प्रचारसभेत विशाल पाटील म्हणाले, कोण काहीही बोलले, तरी यावेळी मशालसोबत विशालपण आहे, शिवाय हातात घड्याळ बांधले आहे. यावेळी नेत्यांनी आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे, असे सांगत त्यांना आठवण करून दिली.
जयंत पाटील यांनीही त्या संवादात उडी घेत चिमटा काढला. ते म्हणाले, आमचे तुतारी चिन्ह अपक्ष खासदारांना कळण्यासाठी तुतारी व्यवस्थित वाजवा. यावर एकच हशा पिकला. जयंत पाटील म्हणाले, विशाल पाटील, तुम्ही अपक्ष उमेदवारीच्या नादाला लागण्याऐवजी तुतारीच्या नादाला लागला असता, तर तुमचे मताधिक्य आणखीन दीड लाखाने वाढले असते. आमचे घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे. मात्र, पृथ्वीवर एकमेव असा पक्ष आहे की, ज्या पक्षाला घड्याळ चिन्ह मिळाले असले, तरी त्याच्या खाली चिन्ह न्यायप्रविष्ठ असल्याचे लिहावे लागतेय.
"त्यांच्यावर कसलेही बंधन नाही"
पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या खासदार म्हणाले, वेगवेगळ्या मतदारसंघांत काय भूमिका घ्यायची, हा ज्याचा- त्याचा प्रश्न आहे. अपक्ष खासदार असल्याने विशाल पाटील यांच्यावर कसलेही बंधन नाही. धड ते काँग्रेसमध्येही नाहीत आणि कुठेही नाहीत. ते तर अपक्ष आहेत.
मिरज विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत
दरम्यान, मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून मोहन वनखंडे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत मिरज विधानसभा मतदारसंघावरून पेच निर्माण झाला होता. मात्र मोहन वनखंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता या मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.त्यामुळे मिरजमध्ये नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.