राजरत्न आंबेडकर, जयश्रीताई यांच्यासह सांगली जिल्ह्यात आठ मतदारसंघांतील २४ अर्ज अवैध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 03:18 PM2024-10-31T15:18:09+5:302024-10-31T15:19:08+5:30
४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत : बहुतांशी अर्जाला पक्षाचा एबी फार्म नसल्याने अवैध
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या अर्जांची बुधवारी छाननी झाली. त्यामध्ये २४ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. मिरज मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज कागदपत्रांतील त्रुटींमुळे अवैध ठरला. अन्य उमेदवारी अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरले असून, त्यांचे अपक्ष अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत असणार आहे.
मिरज मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजरत्न आंबेडकर यांचा अर्ज कागदपत्रांतील त्रुटींमुळे अवैध ठरला. अर्ज छाननीत राजरत्न आंबेडकर यांच्यासह अपक्ष उमेदवार नंदादेवी कोलप, अपक्ष अरुण धोतरे, काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने मोहन वनखंडे, सागर वनखंडे यांचे अर्ज अवैध झाले. मात्र त्यांचे अपक्ष अर्ज वैध ठरले. २७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
शिराळा विधानसभेसाठी २४ उमेदवारी अर्जांपैकी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विराज नाईक व भाजपचे हणमंतराव पाटील यांनी पर्यायी अर्ज दाखल केले होते. हे दोन्ही अर्ज अवैध ठरले. १६ उमेदवारांचे २२ अर्ज वैध झाले आहेत.
खानापूरमध्ये ३७ अर्जांपैकी दोन उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरले. त्यामुळे ३५ उमेदवारी अर्ज वैध आहेत. नारायण खरजे (जनहित लोकशाही पार्टी) व प्रल्हाद गुजले (रिपब्लिकन बहुजन सेना) या दोन उमेदवारांचे अर्ज अवैध झाले.
तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघात तीन उमेदवारांचे सहा अर्ज अवैध ठरले, तर उर्वरित ३३ उमेदवारांचे ३९ अर्ज वैध ठरले.
इस्लामपूर मतदारसंघात २१ उमेदवारांच्या २३ अर्जांची छाननी झाली. निशिकांत पाटील यांनी भाजपकडून भरलेल्या अर्जाला एबी फॉर्म नसल्याने तो अवैध ठरला. त्यांचा दुसरा राष्ट्रवादी पक्षाचा अर्ज वैध ठरला आहे. छाननीनंतर एकूण २२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघात २० उमेदवारांनी २४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ते सर्व अर्ज वैध झाले आहेत.
समान नाव व चिन्हे घेण्याची खेळी..
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे मानसिंगराव नाईक यांचे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह आहे. मात्र राजकीय खेळी करत कापूरवाडी (ता. हातकणंगले) येथील मानसिंग ईश्वर नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे. त्यांनी तुतारी चिन्हांची पहिल्या क्रमांकावर पसंती मागितली आहे. अशा पद्धतीने राजकीय खेळी होत असल्याचे अर्जावरून दिसून येत आहे.
सांगलीत जयश्रीताई यांच्यासह पाच अर्ज अवैध
सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्रीताई पाटील व विरेंद्र सिंह पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून दाखल केलेल्या अर्जाला एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध झाले. पण त्यांचे अपक्ष अर्ज वैध आहेत. अल्लाउद्दीन काझी, प्रकाश बिरजे, जयश्री अशोक पाटील असे पाच अर्ज अवैध झाले आहेत.
अवैध अर्जाची मतदारसंघनिहाय संख्या
मतदारसंघ - अवैध अर्ज
- मिरज - ५
- सांगली - ५
- इस्लामपूर - १
- शिराळा - २
- पलूस-कडेगाव - ०
- खानापूर - २
- तासगाव-क.महांकाळ - ६
- जत - ३
- एकूण - २४