सांगली जिल्ह्यातील तीन मतदारसंघात तिरंगी लढत; कुणाचे गणित बिघडविणार ?..वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:19 PM2024-11-05T16:19:04+5:302024-11-05T16:20:03+5:30
आजपासून प्रचार सभा, बैठकांचा धुरळा
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनी नेते आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार सभा व बैठकांचा धुरळा उडवून दिला आहे. काँग्रेस व भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सभाही येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सांगली, जत, खानापूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरांने तिरंगी लढत, तसेच उर्वरित पाच मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट दुरंगी लढत होणार आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज माघारीची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात ९९ उमेदवार उतरले आहेत. यामध्ये शिराळा, इस्लामपूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ व मिरज अशा पाच मतदारसंघात महाविकास आघाडी विरोधात महायुती असा थेट सामना रंगणार आहे. शिराळ्यातील भाजपचे बंडखोर सम्राट महाडिक यांनी अर्ज माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक व भाजपचे सत्यजित देशमुख अशी दुरंगी लढत आहे.
इस्लामपुरात आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांत पाटील, तर पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम आणि भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख अशी थेट लढत आहे. तासगाव-कवठमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील यांनी दंड थोपटले आहेत. मिरजेत भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात उद्धवसेनेचे तानाजी सातपुते यांनी आव्हान उभा केले आहे.
राजेंद्र देशमुख कुणाचे गणित बिघडविणार ?
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून १९९५ मध्ये राजेंद्र देशमुख हे अपक्ष उमेदवारी लढवून २० हजार २९० मताधिक्य घेऊन निवडून आले. त्यांनी तत्कालीन आमदार अनिल बाबर यांचा पराभव केला होता. यावेळी ॲड. सदाशिवराव पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. २९ वर्षांनी राजेंद्रअण्णा देशमुख यांनी बंडखोरी करून निवडणूक मैदानात शड्डू ठोकला आहे. पण, यावेळी त्यांच्यासमोर शिंदेसेनेकडून सुहास बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील यांचे आव्हान आहे.
सांगली विधानसभेत तिरंगी
सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील अशी दुरंगी लढत होती. पण, काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांनी अर्ज ठेवल्याने तिरंगी लढत होणार आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याचीच सांगली शहरामध्ये चर्चा रंगली आहे. या प्रमुख तीन उमेदवारांसह १४ उमेदवार रिंगणात असल्याचा कुणाला फटका बसणार, याचेही गणितही राजकीय जाणकार मांडत आहेत.
जतमधील आमदारांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता होती. पण, भाजपच्या पक्षश्रेष्ठींची शिष्टाई निष्फळ ठरल्याने तम्मनगौडा रवी पाटील यांनी बंडखोरी कायम ठेवत रिंगणात उतरले आहेत. यामुळे जतमधील लक्षवेधी लढतीकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.