'पलूस-कडेगाव'ची एकतर्फी निवडणूक बनली चुरशीची; विश्वजित कदम-संग्रामसिंग देशमुख यांच्यात लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 06:54 PM2024-11-14T18:54:16+5:302024-11-14T19:00:11+5:30
प्रमोद पाटील किर्लोस्करवाडी : पलूस-कडेगाव मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होणार, असा काँग्रेसचा होरा होता. पण आता ही निवडणूक चुरशीची होत ...
प्रमोद पाटील
किर्लोस्करवाडी : पलूस-कडेगाव मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होणार, असा काँग्रेसचा होरा होता. पण आता ही निवडणूक चुरशीची होत आहे. कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपासून आजी-माजी खासदार यांच्या सभा होत आहेत. तर संग्रामसिंग देशमुख यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत.
गेल्या निवडणुकीत युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले. तसेच, विरोधकांपेक्षा नोटाला जादा मते मिळाली. त्यामुळे डॉ. विश्वजित कदम यांनी ही निवडणूक एकतर्फी व उच्चांकी फरकाने जिंकली होते. यावेळी मात्र ही जागा भाजपकडे गेल्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी कदम व देशमुख अशी सरळ लढत होत आहे.
डॉ. कदम यांनी भारती विद्यापीठ, सोनहिरा साखर कारखाना, दोन्ही सूत गिरण्या आदींच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. विकासकामांच्या बळावर ते आपला विजय निश्चित मानत आहेत. तर गतवेळी पेक्षा जादाचे मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. काहीअशी नाराज असणारा शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेनंतर एकदिलाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. आमदार अरुण लाड हे प्रचारात सक्रिय झाले आहेत.
महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी घरोघर प्रचारावर भर दिला आहे. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकाळात केलेली विकासकामे, केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती ते देत आहेत. त्यांच्यासोबत संपूर्ण देशमुख कुटुंबीय मैदानात उतरले आहेत. सध्या तरी त्यांनी मोठ्या सभांना बगल देऊन वाड्या-वस्त्यांवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. त्यांनाही घटक पक्ष असलेले शिंदेसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस साथ देताना दिसत आहे.
२०१९ च्या निवडणुकीतील चित्र
उमेदवार - पक्ष - मिळालेली मते
डॉ. विश्वजित कदम - कॉंग्रेस - १,७१,४९७
संजय विभुते - शिवसेना - ८,९७६
नोटा मतदान - २०,६५१