राजकीय पक्षांना सत्तेत लाडक्या बहिणींचे वावडे का?, सर्वच पक्षांकडून महिला उमेदवारांबाबत दुजाभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:59 PM2024-10-31T16:59:23+5:302024-10-31T16:59:46+5:30

सांगली : आजची महिला अबला नसून सबला झाली आहे, असे भाषण देणारे नेते मात्र खुद्द महिला शक्तीवरच विश्वास ठेवत ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 All the political parties have negative attitude towards women candidates in the assembly elections | राजकीय पक्षांना सत्तेत लाडक्या बहिणींचे वावडे का?, सर्वच पक्षांकडून महिला उमेदवारांबाबत दुजाभाव

राजकीय पक्षांना सत्तेत लाडक्या बहिणींचे वावडे का?, सर्वच पक्षांकडून महिला उमेदवारांबाबत दुजाभाव

सांगली : आजची महिला अबला नसून सबला झाली आहे, असे भाषण देणारे नेते मात्र खुद्द महिला शक्तीवरच विश्वास ठेवत नसल्याचे दिसून येते. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील एकही जागेवर महायुती व महाविकास आघाडीने महिला उमेदवार दिलेला नाही. राजकीय व्यासपीठावर महिलांचे गुणगाण गाणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना लाडक्या बहिणींचे वावडे का? असा प्रश्न महिलांना पडला आहे.

आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. यात राजकारणही सुटलेले नाही. लोकसभा ते विधानसभा तेथेही महिला महत्त्वाची पदे भूषवत आहेत. राजकारणात महिलांना विशेष ५० टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले. पुढील निवडणुकीत ते लागू होणार आहे. मात्र, आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, या निवडणुकीत महिलांसोबत सर्वच राजकीय पक्षांकडूनच दुजाभाव करण्यात आल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे.

जिल्ह्यातील आठही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांचे चेहरे आता स्पष्ट झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडीने आपली यादी जाहीर केली असून, त्यांच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. येथे मात्र आठही विधानसभा क्षेत्रात त्यांनी एकही महिला उमेदवार दिलेला नाही. विशेष म्हणजे, भाजपने मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या दोघांना पुन्हा संधी दिली. पण एकाही महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेना या पक्षांची सुद्धा हीच स्थिती आहे.

जिल्ह्यात महिलांना १० टक्केही संधी नाही..

राजकारणात महिलांसाठी राखीव जागांमुळे, त्यांच्या सहभागामुळे सर्वसामान्य महिलांचे जीवनमान बदलू लागले आहे. कालपर्यंत शेतात खुरपणारी, चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री पंचायतीत जाऊन गावाचा कारभार पाहू लागली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ५० टक्के राहू द्या, किमान १० टक्के तरी महिलांना संधी देण्याचे धाडस राजकीय पक्षांनी दाखवण्याची गरज होती. पण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांनी सांगली जिल्ह्यातील महिलांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राजकारणापासून दूरच ठेवले आहे.

सांगली जिल्ह्यातील महिला आमदार

आमदार - मतदारसंघ - पक्ष - वर्ष
कळंत्रे आक्का - मिरज - काँग्रेस - १९५२
सरोजिनी बाबर - शिराळा - काँग्रेस - १९५२
शालिनीताई पाटील - सांगली - काँग्रेस - १९८०
सुमनताई पाटील - तासगाव-क. महांकाळ - राष्ट्रवादी - २०१५
सुमनताई पाटील - तासगाव-क. महांकाळ - राष्ट्रवादी - २०१९

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 All the political parties have negative attitude towards women candidates in the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.