मतदारांनो, महायुतीच्या गद्दारांना धडा शिकवा; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 01:45 PM2024-11-19T13:45:44+5:302024-11-19T13:49:22+5:30
..ही ''भारतीय झूठ पार्टी''
कडेगाव : महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अशी महाराष्ट्राची ओळख देशात आणि जगात आहे. नेमके हेच मोदी सरकारला मान्य नाही. म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस फोडली. महाविकास आघाडीतून फुटून गेलेल्या गद्दारांना मतदारांनी या निवडणुकीत धडा शिकवावा आणि महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ पलूस व कडेगाव येथे रेवंत रेड्डी यांची सोमवारी सभा झाली. यावेळी ते बोलत होते. खासदार विशाल पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, युवा नेते डॉ. जितेश कदम, शिवसेनेचे सुभाष मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ही लढाई आपण दोन गुजराती सोबत लढत आहोत. हे अदानी प्रणीत डबल इंजिन सरकार आहे. अदानीसोबत घेऊन मोदी सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांची लूट करीत आहेत. उद्धव ठाकरे सोबत उपमुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस तयार नव्हते. मग तुम्ही एकनाथ शिंदे सोबत उपमुख्यमंत्री कसे झाले. आपण पाच वर्षे मुख्यमंत्री होता. तरीसुद्धा पुन्हा उपमुख्यमंत्री होण्याची काय आवश्यकता होती, असा सवाल रेड्डी यांनी उपस्थित केला.
..ही ''भारतीय झूठ पार्टी''
पंतप्रधान यांच्या आदेशावरून महाराष्ट्रातील मोठे १७ उद्योग आणि कारखाने गुजरातमध्ये हलवले गेले. हे महाराष्ट्राच्या विकासावर प्रहार करणारे आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील नेते गुजरातचे गुलाम झाले आहेत. मग, महाराष्ट्र राज्याचा विकास कसा होईल, असा सवाल रेड्डी यांनी केला. मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचा दावा केला होता. पण, प्रत्यक्षात बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी नसून, ''भारतीय झूठ पार्टी'' आहे, असा दावा रेड्डी यांनी केला.