राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, रोहित पाटील यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 03:24 PM2024-10-25T15:24:25+5:302024-10-25T15:26:37+5:30
जयंत पाटील आठव्यांदा तर मानसिंगराव नाईक पाचव्यांदा निवडणूक रिंगणात
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना इस्लामपुरातून, आमदार मानसिंगराव नाईक यांना शिराळ्यातून, तर रोहित पाटील यांना तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. खानापूर मतदारसंघही त्यांच्याच वाट्याला येण्याची चिन्हे असली, तरी अद्याप या जागेचा निर्णय प्रलंबित आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा शरद पवार गटाला सुटण्याची चिन्हे आहेत.
सांगली जिल्ह्यात विद्यमान आमदारांपैकी जयंत पाटील व मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी कायम राहिली. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्याऐवजी अपेक्षेप्रमाणे त्यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली. आर. आर. पाटील यांनी या मतदारसंघात सलग सहा निवडणुका जिंकल्या होत्या. त्यानंतर सुमनताई पाटील यांनी या मतदारसंघाचे दोनवेळा नेतृत्व केले. आता आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. प्रथमच ते निवडणूक रिंगणात उतरत आहेत.
सांगली जिल्ह्यातील हक्काच्या तीन जागांसह मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला गेलेली खानापूरची जागाही या गटाला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या जागेचा फैसला अद्याप झालेला नाही. ती जागा मिळाली, तर राष्ट्रवादीकडे सर्वाधिक चार जागा येतील. काँग्रेसच्या वाट्याला सध्या तरी पलूस-कडेगाव, सांगली व जत या तीन जागा आल्या आहेत. मिरजेतील जागेवरून काँग्रेस व उद्धवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.
जयंत पाटील आठव्यांदा मैदानात
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील सलग आठव्यांदा मैदानात उतरत आहेत. मागील सात विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकल्याने जिल्ह्यात सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावे झाला आहे. त्यांच्याविरोधात कोण? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
मानसिंगराव नाईक पाचव्यांदा रिंगणात
शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मागील सलग चार निवडणुका लढवल्या. त्यातील दोन निवडणुकांत त्यांना यश मिळाले. यंदा ते पाचव्यांना मैदानात उतरत आहेत. त्यांच्यासमोर उमेदवार कोण? हे अद्याप ठरलेले नाही.
तासगावात नवे समीकरण
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सलग सहा निवडणुका जिंकल्या होत्या. त्यांच्या पश्चात सुमनताईंनी निवडणूक जिंकली. आता त्यांचे पुत्र मैदानात उतरत आहेत. त्यांच्या घरानेही सातवेळा यश मिळवले आहे. आर. आर. पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले माजी खासदार संजय पाटील यंदा रोहित पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. आर. आर. पाटील यांच्याविरोधात त्यांना कधीही यश मिळाले नाही. आता मुलाविरोधात त्यांना यशाची प्रतीक्षा आहे.