ईव्हीएम विरोधात सांगलीत नागरीकांचा महामोर्चा, पोलिसांसह प्रशासनाची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 07:25 PM2024-11-27T19:25:48+5:302024-11-27T19:26:48+5:30
घोषणाबाजीने शहर हादरले
दिलीप मोहिते
विटा ( जि. सांगली) : विधानसभा निवडणूकीत ईव्हीएम यंत्राची छेडछाड केल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या नागरीकांनी बुधवारी विटा तहसील कार्यालयावर महामोर्चा काढला. यावेळी ईव्हीम हटवा, लोकशाही वाचवा, यासह अनेक घोषणांनी शहर हादरवून सोडले. यावेळी संतप्त आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक ईव्हीएम यंत्राची होळी केली.
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपसह महायुतीने यश संपादन केले. हे यश जनतेचे नसून ईव्हीएम यंत्राचे असल्याचा आरोप सर्वस्तरातून होऊ लागला आहे. बुधवारी महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड.वैभव पाटील, अपक्ष माजी आ. राजेंद्र देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संग्राम माने. प्रहारचे उमेदवार भक्तराज ठिगळे यांच्यासह अन्य उमेदवारांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयावर धडक दिली.
हा महामोर्चा मायणी रस्ता, प्रसाद चित्रमंदीर, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. त्यावेळी संतप्त नागरीकांनी प्रतिकात्मक ईव्हीएम यंत्राची होळी करीत यंत्राला जोडे मारले. यावेळी नागरीकांनी पन्नास खोके.. एकदम ओके, ईव्हीएम हटवा.. देश वाचवा यासह अन्य घोषणा देत ईव्हीएम प्रक्रियेचा निषेध केला.
या मोर्चा महिलांचा सहभागही मोठा होता. यानंतर अॅड. वैभव पाटील, राजेंद्र देशमुख, संग्राम माने, भक्तराज ठिगळे यांच्याहस्ते तहसीलदार योगेश्वर टोंपे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. वैभव पाटील यांनी ईव्हीएममुळे महायुती सत्तेत आली असून यात मोठी छेडछाड झाल्याचा आरोप करीत झालेली ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली.
माजी आ. राजेंद्र देशमुख यांनी महायुतीने ईव्हीएम यंत्रात चुकीच्या पध्दतीने छेडछाड करून लोकशाहीचा गळा घोटला आहे. आमच्या हक्काच्या गावांत आमच्याच लोकांनी आम्हाला मते देऊनही ती मते आम्हाला मिळाली नाहीत. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद असून ईव्हीएम विरोधात आमचा लढा कायम सुरू राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी संग्राम माने यांनीही या प्रकाराचा निषेध केला. या महामोर्चात विटा शहरासह खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कलमधील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.