VidhanSabha Election 2024: प्रचारासाठी नेते घरोघरी, मतदारांची मात्र पर्यटनवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 12:49 PM2024-11-08T12:49:14+5:302024-11-08T12:54:18+5:30
नागरिक दिवाळी सुट्यांच्या मूडमध्ये, सुटीनंतर सोमवारपासूनच प्रचाराचा जोर
सांगली : दिवाळी संपली, तरी दिवाळीच्या सुट्यांचा माहोल अद्याप कायम आहे. सांगली शहरातील शेकडो कुटुंबे दिवाळी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी गावोगावी फिरताहेत. पर्यटनाचा आनंद घेत आहेत. यामध्ये उमेदवारांची मात्र गोची होत आहे. प्रचारासाठी गेले असताना अनेक घरे कुलूपबंद दिसत आहेत.
दिवाळीमध्ये शाळा, व्यावसायिक संस्थांना दीर्घ सुट्या असल्याने अनेक कुटुंबे पर्यटनाचे नियोजन करतात. देशभर तसेच विदेशातही सहली काढतात. राज्यभरातील धार्मिकस्थळे या काळात पर्यटकांनी फुललेली पाहायला मिळतात. यंदा ऐन दिवाळीत निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. दिवाळी संपताच ४ नोव्हेंबरला माघार झाली आणि रिंगणात उमेदवार कोण असतील? हे निश्चित झाले. त्यानंतर लगेच प्रचाराच्या फेऱ्याही सुरू झाल्या.
शहरी भागात मतदानाची टक्केवारी जास्त असते. त्यामुळे पहिल्या फेरीत उमेदवार शक्यतो याच भागात प्रचार करतात. यंदा मात्र त्यांना बंद घरांचा सामना करावा लागत आहे. लोक गावोगावी फिरायला गेले आहेत. त्यामुळे बंद घराच्या दाराला प्रचारपत्रक अडकवून मागे फिरावे लागत आहे. सुट्यांचा मूड पाहून शहरी भागात मोठ्या नेत्यांच्या सभादेखील पुढे ढकलल्या जात आहेत.
उमेदवारांनी बदलले प्रचाराचे नियोजन..
सर्रास शाळांच्या सुट्या १० नोव्हेंबर रोजी संपून ११ नोव्हेंबर रोजी वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे सुट्यांवर गेलेले मतदार ११ नोव्हेंबर नंतरच घरोघरी परतणार आहेत. त्यानंतर १८ नोव्हेंबरला जाहीर प्रचार थांबेल. त्यामुळे या मतदारांना गाठण्यासाठी ११ ते १८ नोव्हेंबर हा आठवडाभराचाच कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. शहरी भागातील बंद घरे पाहून उमेदवारांनी प्रचाराच्या १४ दिवसांच्या कालावधीतील पहिला आठवडा ग्रामीण भागाला दिल्याचे दिसत आहे. दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा घेतल्या जातील.