बालेकिल्ला कोणाचा?; सांगली जिल्ह्यात क्रमांक एकच्या खुर्चीसाठी तीन पक्षांत स्पर्धा
By अविनाश कोळी | Published: November 16, 2024 06:29 PM2024-11-16T18:29:50+5:302024-11-16T18:32:30+5:30
बाहुबल वाढविण्यासाठी नेते सरसावले
अविनाश कोळी
सांगली : जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना होत असला तरी पक्षीय स्तरावर जिल्ह्यात क्रमांक एकवर जाण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसमध्ये स्पर्धा रंगली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी ताकद लावली आहे. जागा वाटपावेळी ही या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती.
महायुतीमधून यंदा जिल्ह्यातील आठपैकी सर्वाधिक पाच जागांवर भाजप लढत आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक चार जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत. काँग्रेसही तीन जागा लढवत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन तर दोन्ही सेनेला प्रत्येकी एक जागा वाट्याला आली आहे. त्यामुळे क्रमांक एकच्या शर्यतीत सध्या भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस हे तीनच पक्ष दिसत आहेत. यात कोणाच्या पदरात किती यश मिळणार, याची चर्चा आता रंगली आहे.
पूर्वी सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही हा पक्ष बऱ्याचदा क्रमांक एकवर राहिला. त्यानंतर हा गड काहीवेळा भाजपच्या ताब्यातही गेला आहे. आता या आठही मतदारसंघात सर्वाधिक बाहुबल कोणाचे राहील, हा चर्चा प्रश्न आहे.
सध्या क्रमांक एकवर कोण?
जिल्ह्यात पक्ष विभाजनानंतर ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष क्रमांक एकवर आहे. त्यांच्याकडे ३, भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी २ तर शिंदेसेनेकडे १ असे पक्षीय बलाबल आहे.
पूर्वीचे पक्षीय बलाबल कसे होते
वर्ष - भाजप - राष्ट्रवादी - काँग्रेस - शिवसेना - अपक्ष
२०१४ - ४ -२ - १ - १ - ०
२००९ - ३ - २ - २ - १
२००४ - १ - २ - ३ - ३
१९९९ - ० - ४ - ४ - १
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
- सांगली जिल्ह्यात पक्ष क्रमांक एकवर नेण्यासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सध्याची त्यांच्या पक्षाची क्रमांक एकच खुर्ची राखण्याचे आव्हान आहे.
- दुसरीकडे भाजपला २००९ व २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा अव्वल राहायचे आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद लावली आहे.
- आजवरच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक काळ क्रमांक एकच्या खुर्चीचा मान काँग्रेसला मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांच्यासमोर हा बालेकिल्ला पुन्हा मिळविण्याचे आव्हान असेल.
महाआघाडी विरुद्ध महायुतीची स्पर्धा
सध्याचे पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीकडे पाच, तर महायुतीकडे तीन आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीत ही बाहुबल वाढविण्याची स्पर्धा रंगली आहे. त्यामुळे दोन्हीकडील नेते मित्रपक्षांच्या उमेदवारासाठी ही ताकद लावताना दिसत आहेत.