Vidhan Sabha Election 2024: उमेदवार शब्दाला जागले, तर सांगलीचं शांघाय होईल; घोषणांचा पाऊस अवकाळी न ठरो
By संतोष भिसे | Published: November 16, 2024 05:55 PM2024-11-16T17:55:26+5:302024-11-16T17:55:56+5:30
चांगल्या सांगलीची स्वप्नेच किती दिवस?
संतोष भिसे
सांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गेल्या दोन आठवड्यांत सर्वच मतदारसंघांतील उमेदवारांनी घोषणा आणि आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. हा पाऊस अवकाळी ठरला नाही आणि सगळेच उमेदवार शब्दाला जागले, तर सांगलीचं शांघाय होण्यास वेळ लागणार नाही.
अर्थात, गेल्या २५-३० वर्षांपासून जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांचे घोंगडे भिजतच ठेवणाऱ्या बोलघेवड्या उमेदवारांची ही आश्वासने म्हणजे `बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे` हे मतदार चांगलेच ओळखून आहेत. सांगलीच्या शेरीनाल्याचा प्रश्न वर्षानुवर्षे सोडवू न शकलेले लोकप्रतिनिधी सांगलीकरांना गटारीचे पाणी पाजण्याचे पाप करीत आहेत याचीही जाण मतदारांना आहे. पण `उडदामाजी काळेगोरे` म्हणत मतदान करत आहेत.
उमेदवार म्हणाले, `सांगलीत आयटी पार्क उभा करू`, तेव्हा मतदारांनी आपली मुले आयटीमध्ये ऐटीत जातानाची स्वप्ने पाहिली. दिल्ली-मुंबईतील नेते विकासाचा कैवार घेऊन सांगलीच्या वेशीवर धडकले. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प लोकांसमोर सजवून-धजवून ठेवले. ते पाहून लोक त्यांना निवडून देतीलही, पण सांगलीचा शांघाय खरोखरच होणार का? याची प्रतीक्षा त्यांना राहील. निवडून आलेले मंत्री होतील, मुख्यमंत्रीही होतील, पण सांगलीकरांची माफक अपेक्षा इतकीच की कृष्णेत मिसळणारे सांगलीतील गटारीचे पाणी थांबावे.
हाडे खिळखिळी न होता पेठपर्यंत प्रवास करता यावा. कोल्हापूरपर्यंत वाहतूक कोंडीत न अडकता जाता यावे, पदवी मिळविलेल्या पोराला सांगलीतच चांगली नोकरी मिळावी आणि उतारवयातील आईवडिलांना सांभाळत तो गावातच रहावा. सांगलीचे अगदीच शांघाय झाले नाही, तरी `चांगली सांगली` बनविणे तरी मुश्किल नक्कीच नाही.
विमानतळ जोरातच
कवलापुरात होणार होणार म्हणून गेली अनेक वर्षे सांगलीकरांच्या स्वप्नात दिसणाऱ्या विमानतळालाही नेत्यांनी `दे धक्का` देण्याचा प्रयत्न केला. नेत्यांची हेलिकॉप्टरे कवलापूरच्या माळावर धूळ उडवत उतरली, धूळ उडवत उडून गेली. जाताना सांगलीकरांच्या स्वप्नाला गुलाबी रंग देऊन गेली.
आम्ही `हे` करू आणि `ते` करू
गेल्या पंधरवड्याभरात उमेदवारांनी उघडलेल्या आश्वासनांच्या पोतडीकडे नजर टाकली असता शिळ्या कढीलाच ऊत आणण्याचा प्रयत्न सर्वत्र दिसतो. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे आदी पाणीयोजना या निवडणुकीतही चलनी नाण्यासारख्या वापरल्या गेल्या. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, एमआयडीसीची उभारणी व तरुणांना रोजगार, महिलांसाठी उद्योग ही गाजरेदेखील मतदारांना दाखविण्यात आली. शेतमालाला भाव, लाजिस्टिक पार्क, ड्रायपोर्ट, महागाई, महिलांचे संरक्षण, गुन्हेगारी हे पत्तेदेखील जोरात चालविण्यात आले. उमेदवारांच्या तोंडभरल्या घोषणा मतदारांनी मन लावून ऐकल्या आणि जोरजोराने टाळ्यादेखील वाजविल्या; पण ते आता कोणाला गुलालाचा मानकरी ठरविणार आणि कोणाला घरात बसविणार हे दि. २३ नोव्हेंबर रोजी कळेल.