VidhanSabha Election 2024: नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत विकासाचे मुद्देच गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 04:42 PM2024-11-07T16:42:21+5:302024-11-07T16:43:01+5:30
कृषी प्रक्रिया उद्योग वाढीकडे दुर्लक्ष : शेतीला अखंडित वीजच नाही
अशोक डोंबाळे
सांगली : मतदान अवघ्या १४ दिवसांवर आले असून प्रचाराला केवळ १२ दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्यात फक्त आरोप-प्रत्यारोप, घराणेशाही याभोवतीच निवडणुकीचा प्रचार फिरत आहे. हळद, द्राक्ष संशोधन केंद्र, कवठेमहांकाळचे ड्रायपोर्ट आणि नवीन उद्योगवाढीच्या प्रश्नावर एकही पक्ष चर्चा करताना दिसत नाहीत. विकासाच्या गप्पा मारताना गेल्या २५ वर्षांत शेतीला अखंडित दिवसाची वीज मिळत नाही. यासह सर्वच विकासाचे मुद्दे मात्र हवेत विरल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात दहा तालुके असून आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यांना बारमाही पाणी असून पाच तालुके कायमस्वरूपी दुष्काळी आहेत. सिंचन योजनांवरच दुष्काळी भागातील पीक अवलंबून आहेत. गेल्या दोन दशकांत ग्रामीण भागाचा फारसा विकास झालेला नाही. ग्रामीण भागात अजूनही गरिबी, कमी साक्षरता दर, शाळा आणि रुग्णालये यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव, यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे नवनवीन संधींच्या शोधात तरुणाई शहरी भागात स्थलांतरित होत आहे. राजकर्त्यांमधील एकमेकांच्या जीरवाजीरवीमध्ये ग्रामीण भागात उद्योग वाढले नाहीत. यामध्ये शेतकरी, बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात भरडला आहे. पण, शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर एकही राजकीय पक्षाचा नेता बोलायला तयार नाही.
जिल्ह्याच्या विकासासाठी हे मुद्दे महत्त्वाचे
- द्राक्ष, हळदीला जीयआय मानांकन मिळाले असून संशोधन केंद्रे उभे करून मार्केटिंगची ठोस व्यवस्था झाली पाहिजे.
- शेती उत्पादने ठेवण्यासाठी शासनाने शीतगृहे बांधण्याची गरज.
- द्राक्ष, हळद, बेदाणा, डाळिंबासह अन्य फळांच्या निर्यातीसाठी मूलभूत पायाभूत सुविधा गरजेची
- मार्केट यार्डामधील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडूनच प्रयत्न व्हावेत.
- जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात पडिक जमिनीचे क्षेत्र मोठे असून या ठिकाणी उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज
प्रत्येक तालुक्यात रोजगार वाढवा : संजय कोले
जनतेला गरीब ठेवून त्यांच्या शोषणावर राजकारण करण्याची राजकर्त्यांची प्रवृत्ती वाईट आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये छोटे-मोठे उद्योग वाढविल्यास तेथील तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. पण, गेल्या ४० वर्षांत उद्योग वाढविण्यासाठी राजकर्त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. सहकारातील साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, दूध संघांचे राजकीय अड्डे झाल्यामुळे ते बंद पडले. बेरोजगारी वाढली असून शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी दिली.
ड्रायपोर्ट, लॉजिस्टिक पार्कच्या घोषणाच
रांजणीतील ड्रायपोर्टचा प्रस्ताव रद्द झाल्यामुळे सलगरे येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे आश्वासन जिल्हावासीयांना मिळाले होते. गेल्या चार वर्षांत तत्कालीन लोकप्रतिनिधींकडून केवळ घोषणाबाजीच जास्त झाली. ड्रायपोर्ट आणि लॉजिस्टिक पार्क जिल्ह्यात कुठेच झाले नाही. सत्ताधाऱ्यांनी घोषणा पूर्ण केली नाही आणि ते झाले नाही, म्हणून विरोधकांनीही कधी तोंड उघडले नाही.
पलूसच्या वाईन पार्कला उतरती कळा
पलूस येथे तत्कालीन उद्योग मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पलूस, तासगाव, खानापूर तालुक्यात द्राक्ष क्षेत्र मोठे आहे. म्हणून पलूसमध्ये 'कृष्णा वाईन पार्क' विकसित केले. पण या वाईन पार्कला शासनाच्या जाचक अटीची खीळ बसली. त्यामुळे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यापूर्वीच त्या उद्योगास उतरती कळा लागली. परिणामी, या भागातील द्राक्ष बागायतदार सध्या काबाड कष्ट करूनही आर्थिक संकटात सापडला आहे.