दुष्काळाचा कलंक पुसणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:25 PM2024-11-07T12:25:18+5:302024-11-07T12:26:15+5:30
जत : भाजपा महायुती शासनाने जलसंपदा विभागाची कामे हाती घेऊन जत तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला. आणखी विकासकामे ...
जत : भाजपा महायुती शासनाने जलसंपदा विभागाची कामे हाती घेऊन जत तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला. आणखी विकासकामे मार्गी लागण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत येथील सभेत केले.
जत विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सुरवात केली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपचे जतचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष दीपक म्हैसाळकर-शिंदे, दौलत शितोळे, डॉ. रवींद्र आरळी, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, राष्ट्रवादीचे सुनील पवार, पप्पू डोंगरे, आर. के. पाटील, आरपीआयचे संजय कांबळे उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, मी २०२२ मध्ये जलसंपदा विभागाचा मंत्री झालो. राज्यातील दुष्काळी भागातील अनेक प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे भविष्यात अख्खा महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार आहे. तुम्हाला ‘शब्द’ देतो, आताच्या पिढीने दुष्काळ पहिला असेल, मात्र येणारी पिढी ही दुष्काळ पाहणार नाही. कृष्णा व कोयना उपसा सिंचन योजना ८ हजार २७२ कोटी, तर विस्तारित म्हैसाळ योजनेला दोन हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील ६४ गावांचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटणार आहे.
राज्यातील सौरऊर्जावरील पहिला म्हैसाळ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या योजनेला दोनशे मेगावॅट वीज लागते. ही वीज या प्रकल्पातून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना पाणी, वीज मोफत देणार असून त्यांची कर्जमाफीदेखील केली जाणार आहे. मी पहिल्या विधानसभा मतदारसंघात प्रचार शुभारंभ करण्याऐवजी शेवटच्या २८८ व्या जत मतदारसंघाला एक नंबरचा मतदारसंघ करण्यासाठी आलो आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
भारत जोडो नाही, तर तोडो आंदोलन..
आज राहुल गांधी महाराष्ट्रात आलेत. ते ज्या पद्धतीची मोट बांधतायेत, ती महाराष्ट्रासाठी व देशासाठी घातक आहे. कारण भारत जोडोमध्ये ज्या संघटना आहेत, त्यातील काही संघटना अराजकता पसरवणाऱ्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचे भारत जोडो नाही, तर भारत तोडो आंदोलन आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.