सांगली जिल्ह्यात महाआघाडीला घेरण्याची महायुतीची रणनीती, पाच मतदारसंघांत एकास एक लढत

By हणमंत पाटील | Published: November 13, 2024 06:53 PM2024-11-13T18:53:20+5:302024-11-13T18:54:13+5:30

विश्वजीत कदम, जयंत पाटील, रोहित पाटील या स्टार प्रचारकांना बालेकिल्ल्यातच घेरण्याची रणनीती

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Mahayuti strategy to encircle the Mahavikas Aghadi in Sangli district | सांगली जिल्ह्यात महाआघाडीला घेरण्याची महायुतीची रणनीती, पाच मतदारसंघांत एकास एक लढत

सांगली जिल्ह्यात महाआघाडीला घेरण्याची महायुतीची रणनीती, पाच मतदारसंघांत एकास एक लढत

हणमंत पाटील

सांगली : जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतील जागा वाटपात महायुतीत भाजपाला सर्वाधिक पाच, राष्ट्रवादीला दोन आणि शिंदेसेनेला खानापूरची एक जागा मिळाली. तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चार, काँग्रेसला तीन व उद्धवसेनेला मिरजची एक जागा मिळाली आहे. हा जिल्हा महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु, जिल्ह्यातील आठपैकी पाच जागा घेऊन भाजपाने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवा नेते रोहित पाटील या स्टार प्रचारकांना बालेकिल्ल्यातच घेरण्याची रणनीती आखली आहे.

जिल्ह्यातील आठपैकी सांगली, खानापूर व जत मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. त्यामध्ये सांगली मतदारसंघात काँग्रेसमध्ये, खानापूरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आणि जतला भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. मात्र, जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश देऊन त्यांना महायुतीची उमेदवारी दिली.

तसेच तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे रोहित पाटील यांच्याविरोधात भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश देत त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी एकास एक लढत होत आहे. तसेच पलूस-कडेगाव मतदारसंघातही डॉ. विश्वजीत कदम यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी भाजपाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्याशी एकास एक थेट लढत होत आहे.

पाच मतदारसंघांत एकास एक लढत..

सांगली, जत, पलूस-कडेगाव या तीन मतदारसंघात काँग्रेस व भाजपाची थेट लढत आहे. तशीच लढत इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी आहे. जिल्ह्यातील आठपैकी मिरज मतदारसंघाचा अपवाद वगळता सात मतदारसंघांत तुल्यबळ लढती असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.

  • ६६ टक्के : मतदान २०१९ मध्ये विधानसभेसाठी होते.
  • ७१ : उमेदवारांनी गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात नशीब आजमावले.
  • ५३ : उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.


निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • कवलापूर येथील सांगली विमानतळाची जागा अनेक वर्षांपासून पडून आहे. त्यामुळे याठिकाणी अतिक्रमण वाढत आहे. परंतु, अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
  • जिल्ह्यातील रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील ड्रायपोर्ट आणि सलगरे (ता. मिरज) येथील लॉजिस्टिक पार्क हे दोन्हीही प्रकल्प कागदावर राहिले आहेत.
  • जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी वंचित गावांना म्हैसाळ योजनेच्या विस्तारित व टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यातील कामांचा श्रेयवाद सुरू आहे.
  • सांगलीतील महापुरामुळे कृष्णा नदीकाठावरील गावांचे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी कधी होणार?


जिल्ह्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे चित्र असे.

विधानसभा मतदारसंघ - मतदान - विद्यमान आमदार - पक्ष  - मिळालेली मते

सांगली  - ५८ - सुधीर गाडगीळ - भाजपा - ९३,६३६
मिरज - ५४.५ - सुरेश खाडे - भाजपा - ९६,३६९
इस्लामपूर - ७३.७ - जयंत पाटील - राष्ट्रवादी - १,१५,५६३
शिराळा - ७८.१ - मानसिंग नाईक - राष्ट्रवादी - १,०१,९३३
पलूस-कडेगाव - ६७.४ - विश्वजीत कदम - काँग्रेस - १,७१,४९७
खानापूर - ६६.५ - अनिल बाबर - शिवसेना - १,१६,९७४
तासगाव-कवठेमहांकाळ - ६७.८ - सुमनताई पाटील - राष्ट्रवादी - १,२८,३७१
जत  - ६४.४ - विक्रमसिंह सावंत - काँग्रेस - ८७,१८४

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Mahayuti strategy to encircle the Mahavikas Aghadi in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.