Vidhan Sabha Election 2024: मिरजेत सुरेश खाडे यांचा विजयाचा चौकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:23 PM2024-11-24T18:23:21+5:302024-11-24T18:23:47+5:30
मिरज : मिरज विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांनी ४४ हजार मताधिक्याने विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. आतापर्यंत ...
मिरज : मिरज विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांनी ४४ हजार मताधिक्याने विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. आतापर्यंत पाचव्यांदा आणि मिरजेत सलग चारवेळा विजय मिळविण्याचा विक्रम सुरेश खाडे यांनी केला आहे. सुरेश खाडे यांना १ लाख २८ हजार ०६८ व महाआघाडीचे तानाजी सातपुते यांना ८३ हजार ७८९ मते मिळाली.
मिरजेत शासकीय गोदामात गुरुवारी मतमोजणी पार पडली. टपाली मतदानासह शहरी व ग्रामीण भागातील १६ फेऱ्यात सुरेश खाडे यांना मताधिक्य मिळाले. बाराव्या फेरीत मात्र तानाजी सातपुते यांनी सहा हजारांचे मताधिक्य मिळविले. प्रत्येक फेरीत मताधिक्य वाढत गेल्याने मतमोजणी केंद्राबाहेर व खाडे यांच्या कार्यालयासमोर महायुती कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. यावेळी ११ टक्के जादा मतदानामुळे बाजी कोण मारणार कमळ की मशाल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती; मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून खाडे यांनी आघाडी घेतली. यावेळी शहर व ग्रामीण भागात उत्स्फूर्त मतदान झाले होते.
मिरजेतील ३ लाख ४७ हजार मतदारांपैकी २ लाख २७ हजार १८९ मतदारांनी ६६.०७ टक्के मतदान केले. गतवेळेस ५५.१७ टक्के मतदान झाले होते. यंदा ११ टक्के जास्त मतदानाचा फायदा खाडे यांनाच झाल्याचे निकालात स्पष्ट झाले. महायुतीचे उमेदवार पालकमंत्री सुरेश खाडे व महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासह १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील वंचित आघाडीचे विज्ञान माने यांना साडेपाच हजार व एमआयएमचे डॉ. महेश कांबळे यांना अडीच हजार मते मिळाली. मिरज विधानसभा मतदारसंघात ३०७ मतदान केंद्रांतील मतमोजणी ३२ टेबलांवर १६ फेऱ्यांत पार पडली. दुपारी दोन वाजता मतमोजणी पूर्ण होऊन आमदार सुरेश खाडे यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी विजयी घोषित केले. टपाली मतपत्रिका मोजणीसाठी निकालानंतर मिरजेत भाजप समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.
फेरमतदानाची मागणी
निकालानंतर शिवसेना उमेदवार तानाजी सातपुते यांनी मतमोजणीत मोठी तफावत आढळून आल्याने मतपत्रिकेवर फेर निवडणूक घेण्याची मागणी केली. ते म्हणाले, मतदारांनी मला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, जनतेने केलेले मतदान कोठे गेले हे मतदान यंत्रात समजत नाही. त्यामुळे हा निकाल मला मान्य नाही. मतदानयंत्रात गैरप्रकार होत असतील, तर हे लोकशाहीला घातक असल्याचे त्यांनी सांगितले.
४४ हजारांचे मताधिक्य..
पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेत सलग चारवेळा विजय मिळविण्याचा विक्रम केला आहे. गत निवडणुकीत सुरेश खाडे यांना २९ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिरजेत विशाल पाटील यांना २५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी सुरेश खाडे यांना ४४ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.
विजयाची कारणे
- सुरेश खाडे यांचे निवडणुकीपूर्वी प्रचाराचे नियोजन
- मिरज पूर्व भागात अजितराव घोरपडे यांच्या गटाचा पाठिंबा.
- भाजपची प्रचारयंत्रणाही तुलनेने तगडी होती.
पराभवाची कारणे
- महाविकास आघाडी उमेदवार निश्चितीला विलंब झाला.
- कोणा मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत.
- उद्धवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचेही मिरजेकडे दुर्लक्ष झाले.