Sangli: शिराळा मतदारसंघात महाडिक-देशमुख यांच्यात रस्सीखेच; महायुतीत बंडखोरीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:16 PM2024-10-23T18:16:20+5:302024-10-23T18:16:59+5:30

उमेदवारी जाहीर झाल्यावर लढत दुरंगी की तिरंगी होणार याचे चित्र स्पष्ट होणार

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Samrat Mahadik or Satyajit Deshmukh from the Grand Alliance against MLA Mansingrao Naik in Shirala Constituency is still undecided | Sangli: शिराळा मतदारसंघात महाडिक-देशमुख यांच्यात रस्सीखेच; महायुतीत बंडखोरीची शक्यता

Sangli: शिराळा मतदारसंघात महाडिक-देशमुख यांच्यात रस्सीखेच; महायुतीत बंडखोरीची शक्यता

विकास शहा

शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, विरोधात भाजप महायुतीचे सत्यजित देशमुख की सम्राट महाडिक यापैकी कोण यामध्ये अद्याप निर्णय झालेला नाही. ही उमेदवारी जाहीर झाल्यावर बंडखोरीची शक्यता आहे. त्यानंतर मतदारसंघात ही लढत दुरंगी की तिरंगी होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजपच्या उमेदवारीसाठी महाडिक व देशमुख हे मुंबईत ठाण मांडून आहेत. यातच महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार गटानेही या जागेवर दावा केला आहे. या मतदारसंघात संपूर्ण शिराळा तालुका व वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. ४८ गावांत शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री जयंत पाटील व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची ताकद आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नाईक भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली होती. महाडिक हे अपक्ष लढूनही त्यांना ४६ हजार मतदान झाले होते. यावेळी भाजपला भगतसिंग नाईक यांची ताकद मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.

महाडिक व देशमुख यांच्यात रस्सीखेच

भाजप उमेदवार कोण हे अद्याप ठरले नाही. मात्र, देशमुख किंवा महाडिक दोन्ही गटांकडून उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा दावा केला जातोय. मात्र, यावेळी बंडखोरी करणार नसल्याचे दोन्ही इच्छुकांनी आश्वासन दिले आहे. मात्र, सभांमध्ये सहकारी संस्थांचा कारभार, वाकुर्डे योजनेची विकासकामे यावरून एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या रोज इकडून तिकडे उड्या सुरू असल्याने दिवसागणिक राजकारण तापत चालले आहे.

  • मतदारसंघात पुरुष मतदार : १ लाख ५४ हजार ७१९
  • महिला मतदार संख्या : १ लाख ४८ हजार ८०४
  • तृतीयपंथी : ३
  • एकूण मतदार संख्या- ३ लाख ३ हजार ५२६


२०१९ शिराळा विधानसभेत मिळालेली मते

  • मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (राष्ट्रवादी) १,०१,९३३
  • शिवाजीराव यशवंतराव नाईक (भाजप) ७६,००२
  • सम्राट नानासाहेब महाडिक (अपक्ष) ४६,२३९


२०२४ हातकणंगले लोकसभेतील शिराळा विधानसभेतील मताधिक्य..

  • धैर्यशील माने - ८०,७२०
  • सत्यजित पाटील - ९०,००१
  • राजू शेट्टी - १७,४९९

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Samrat Mahadik or Satyajit Deshmukh from the Grand Alliance against MLA Mansingrao Naik in Shirala Constituency is still undecided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.