संजय पाटील विधानसभेनंतर तासगावची नगरपरिषद लढतील, विशाल पाटील यांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 04:42 PM2024-10-25T16:42:45+5:302024-10-25T16:44:32+5:30
'पोराला डावलणारे जनतेसाठी काय लढणार'
तासगाव : माजी खासदार संजय पाटील सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. म्हणून ते आता विधानसभेनंतर तासगावची नगरपरिषदेची निवडणूक लढवतील, अशी टीका काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांनी तासगावमध्ये केली.
पाटील म्हणाले, जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो तो जनतेसाठी काय लढणार? अशा व्यक्तीला बाजुला करण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. त्यांना पुन्हा डोके वर काढू देणार नाही. लोकसभा निवडणुकीत जनतेने सत्ता काढून घेतल्यानंतर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. काहीतरी करून पुन्हा सत्ता काबीज करायची, या भावनेने ते आता आमदारकी लढणार आहेत. येथील पराभवानंतर कदाचित तासगावची नगरपरिषद देखील लढतील.
एकदा आमदार, दोनवेळा खासदार; पण सत्तेत राहूनसुद्धा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाहीत. दुसऱ्याने केलेल्या कामावर स्वतःला नाव जोडायची वेळ येते. त्यामुळे संजय पाटील सत्तेसाठी विधानसभा लढत आहेत, अशा शब्दांत त्यांनी संजय पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.