खानापूर मतदारसंघात साखर कारखान्यांच्या धुराड्याचा मुद्दा तापला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 06:22 PM2024-11-09T18:22:03+5:302024-11-09T18:22:49+5:30
संदीप माने खानापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ...
संदीप माने
खानापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे धुराडे मीच पेटवणार असे ठासून सांगितले. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील बंद कारखान्यांच्या धुराड्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे.
खानापूर मतदारसंघामध्ये आटपाडीचा माणगंगा व नागेवाडीचा यशवंत हे दोन सहकार क्षेत्रातले साखर कारखाने स्थापन करण्यात आले होते. खानापूरचे माजी आमदार संपतराव माने यांनी नागेवाडीच्या माळरानावर यशवंत सहकारी साखर कारखाना व आटपाडीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडीच्या फोंड्या माळावर माणगंगा सहकारी साखर कारखाना उभारला. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष व उसाची कमतरता असतानाही हे कारखाने चांगल्या स्थितीमध्ये चालवून कर्जमुक्त करण्यात आले. मात्र, त्यानंतर दुष्काळी भागामुळे उसाची प्रचंड कमतरता, बेसुमार कामगार भरती व कारखान्यातील राजकारण यामुळे या कारखान्यावरील कर्जाचा बोजा वाढत जाऊन या कारखान्यांची धुराडी बंद पडली.
खानापूर व आटपाडी तालुक्यातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हे दोन कारखाने काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. या भागामध्ये पाण्याची टंचाई असल्याने ऊस क्षेत्र कमी होते. त्यामुळे कारखान्यांचा मुद्दा मागील निवडणुकांमध्ये फारसा पटलावर आला नाही. मात्र, आता खानापूर व आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आले. यावर्षी प्रचंड पाऊस पडल्याने ऊस क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. हक्काचे कारखाने बंद असल्याने हा ऊस कुठे घालायचा, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. त्यामुळे शेतकरी याबाबत नेत्यांकडे विचारणा करू लागले आहेत.
माणगंगा कारखान्याचा मुद्दा ऐरणीवर..
हाच मुद्दा पकडत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आमदारकीपेक्षा माझ्यासाठी कारखाना महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत माणगंगेचे धुराडे पेटवणारच, अशी घोषणा आटपाडी येथील देशमुख गटाच्या मेळाव्यात केली होती. हा कारखाना चालू करण्यासाठी सर्व नेत्यांना भेटणार असून, जो सहकार्य करील त्याच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. हाच धागा पकडत जयंत पाटील यांनी खानापुरात कारखान्याच्या धुराड्याच्या मुद्याला हवा दिल्याने खानापूर मतदारसंघाचे राजकारण तापले आहे.
धुराड्यावर करेक्ट कार्यक्रम
खानापूर मतदारसंघामध्ये शिंदेसेनेकडून सुहास बाबर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील व अपक्ष राजेंद्रअण्णा देशमुख रिंगणात आहेत. ‘यशवंत’ कारखान्यावर बाबर गटाची सत्ता होती. माणगंगेवर देशमुख गटाची सत्ता होती. त्यामुळे धुराड्याच्या मुद्यावरून जयंत पाटील कुणाचा करेक्ट कार्यक्रम करतात की विरोधक त्यांचा डाव हाणून पाडतात, हे मतमोजणीनंतरच समजणार आहे.