लोकसभेत तुम्ही सोबत नव्हता, आता विधानसभेत आम्हाला गृहीत धरू नका
By संतोष भिसे | Published: November 6, 2024 06:28 PM2024-11-06T18:28:11+5:302024-11-06T18:31:46+5:30
संतोष भिसे सांगली : विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष लढती दोघा उमेदवारांमध्ये होत आहेत, मात्र त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय उट्टे ...
संतोष भिसे
सांगली : विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष लढती दोघा उमेदवारांमध्ये होत आहेत, मात्र त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय उट्टे काढण्यासाठी अनेक नेतेमंडळी पुढे सरसावली आहेत. स्वत: रिंगणात नसलो, तरी हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असाच त्यांचा आविर्भाव आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीतील राजकीय संघर्षाचे प्रतिबिंब विधानसभेच्या निवडणुकीत दिसू लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला होता. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष व काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रामाणिक काम केले नाही, राजधर्म पाळला नाही, असा जाहीर आरोप त्यावेळी झाला होता. उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर जाहीररित्या अनेकदा ही खदखद व्यक्त केली होती. स्थानिक पातळीवर त्याचे उट्टे काढण्याची संधी आता विधानसभा निवडणुकीत साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सांगलीतील एका नेत्याने जाहीर सभेत हा इशारा दिला. लोकसभेत तुम्ही सोबत नव्हता, आता विधानसभेत आम्हाला गृहीत धरू नका, अशी डरकाळी त्याने फोडली.
जिल्हाभरातील अन्य मतदारसंघांतही जुने हिशेब पूर्ण करण्यासाठी नेतेमंडळी मैदानात उतरली आहेत. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आर. आर. पाटील आणि अजितराव घोरपडे गटाचे सूत फारसे जमले नाही. आता तर स्वत: घोरपडे यांनीच रोहित पाटील यांच्याविरोधात संजय पाटील यांच्याशी हातमिळवणी केली आहे. जतमध्ये विलासराव जगताप आणि गोपीचंद पडळकर एकाच पक्षाचे म्हणजे भाजपचे नेते, पण विधानसभेत त्यांच्यात उभा संघर्ष पेटला आहे. विशेष म्हणजे जगताप यांनी लोकसभेलाही काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांचा जाहीर प्रचार करताना भाजपच्याच संजय पाटील यांच्या पाडावासाठी रणनीती आखली होती. विधानसभेला आम्हाला गृहीत धरू नका, असाच जणू इशारा त्यांनी पक्षाला दिला आहे.
इस्लामपुरात निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने जयंत पाटील विरोधक एकवटले आहेत. भाजप नेते सम्राट महाडिक यांनी माघार घेत निशिकांत पाटील यांना बळ दिले आहे. शिराळ्यातही सत्यजित देशमुख यांच्यासोबत आहेत. लोकसभेला कडू घोट घेतलेली जिल्ह्यातील उद्धवसेनाही विधानसभेला उट्टे काढण्याच्या तयारीत आहे. मिरजेची जागा मागून घेत ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
खानापूर-आटपाडीचा निर्णय काय?
खानापूर-आटपाडीत गेली अनेक वर्षे भाजपमध्ये काम करणाऱ्या राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली, पण मिळत नाही म्हटल्यावर अपक्ष म्हणून स्वतंत्र झेंडा फडकविला. उमेदवारी नाकारणाऱ्या भाजपचे उट्टे काढण्याच्या प्रयत्नात या मतदारसंघाचा निकाल काय लागणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मिरजेत लोकसभेला एक, विधानसभेला दुसरेच!
मिरजकरांची तर बातच वेगळी आहे. लोकसभेला त्यांनी काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांचे पाकीट घरोघरी पोहोचविले. भाजपश्रेष्ठींनी आजी-माजी नगरसेवकांना हात जोडून विनवण्या केल्या, पण त्यांनी संजय पाटील यांचे काम करायला नकार दिला. तेच कारभारी आता विधानसभेला मात्र स्वत:हून भाजपचा प्रचार करणार, असे जाहीर करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पत्रकार बैठकीत तशी घोषणाच करून टाकली. काँग्रेसनेते डॉ. विश्वजित कदम यांनी त्यांची झाडाझडती घेतली, त्यानंतर वातावरण काहीसे नरमले. पण सध्याचे मिरजेतले चित्र वेगळेच आहे. एखाद्याची गेम करायची तर पक्षनिष्ठा गेली वाऱ्यावर अशीच भूमिका कारभाऱ्यांची आहे.