निकाल धक्कादायक, अविश्वसनीय; ईव्हीएममध्ये गोंधळाची शंका - विश्वजित कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:24 PM2024-11-25T12:24:37+5:302024-11-25T12:25:06+5:30

पलूस : विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक, आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय आहे. ईव्हीएममध्ये खरोखरच काही गोंधळ आहे का? अशी शंका येण्यासारखी ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The result of the assembly election is shocking Suspicion of confusion in EVMs says Vishwajit Kadam | निकाल धक्कादायक, अविश्वसनीय; ईव्हीएममध्ये गोंधळाची शंका - विश्वजित कदम

निकाल धक्कादायक, अविश्वसनीय; ईव्हीएममध्ये गोंधळाची शंका - विश्वजित कदम

पलूस : विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक, आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय आहे. ईव्हीएममध्ये खरोखरच काही गोंधळ आहे का? अशी शंका येण्यासारखी स्थिती असल्याचे मत पलूस - कडेगाव मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.

कुंडल (ता. पलूस) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व क्रांती साखर कारखान्यातर्फे डॉ. कदम यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कदम यांनी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या समाधीचे दर्शन घेतले. कारखाना कार्यस्थळावर यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कदम म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. महायुतीच्या कारभाराला कंटाळलेली जनता विधानसभेतही महाविकास आघाडीला यश देईल असे वाटत होते; मात्र निकाल आश्चर्यकारक व धक्कादायक आहे. काही वर्षांपूर्वी पुरोगामी व काँग्रेसवादी विचारसरणीच्या नेत्यांनी ईव्हीएम हटाव, देश बचाव अशी चळवळ उभी केली होती. कालच्या निकालानंतर ईव्हीएममध्ये खरेच काही गोंधळ आहे का? अशी शंका येत आहे.

कदम म्हणाले, पुरोगामी विचारधारेवर जातीयवादी शक्तींचे आक्रमण झाले आहे. जातीयवादी लोक दिशाभूल करीत आहेत. महाराष्ट्रात धनशक्तीचा प्रचंड वापर होऊ लागल्याने लोकांना अशा शक्तीपासून वाचविण्याची गरज आहे. तरुणांत नैतिक व पुरोगामी विचार पेरण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी हातात हात घालून एकत्रित येऊन अशा शक्तींना पराभूत करु. आमदार अरुण लाड म्हणाले, कालच्या निकालावरून हे असे का होत आहे याचे कोडे पडले आहे. लोकसभेच्या पराभवानंतर महायुतीने दिशा बदलली. लोकांना जे नको आहे, तिकडे नेण्याचा प्रयत्न केला.

शरद लाड म्हणाले, पलूस-कडेगावची जनता भाजपच्या फसव्या योजना व फसव्या प्रचाराला बळी पडली नाही. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन काम केल्याने यश मिळाले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार उपस्थित होते.

प्रेमाची परतफेड दुपटीने

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, विधानसभेचा निकाल काहींना रूचला, काहींना रुचला नाही. मात्र यापुढे कोणाच्याच मनात चुकीचा विचार किंवा चुकीचे राजकारण येता कामा नये. कदम यांना प्रेम दिले की ते दुप्पट प्रेम देतात. सत्ता नसली तरी आता आपण थांबायचे नाही. लोकांची ताकद आपल्याकडे आहे. त्यांना सोबत घेऊन मुख्य प्रश्नांसाठी लढू. मतदारसंघाच्या विकासासाठी लाड व कदम कुटुंबीय एकजुटीने, एकदिलाने यापुढे काम करतील. शरद लाड व आमदार अरुण लाड यांचे व कार्यकर्त्यांचे ऋण कायम राहील.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The result of the assembly election is shocking Suspicion of confusion in EVMs says Vishwajit Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.