उद्धवसेनेला सांगली जिल्ह्यात एक जागा मिळण्याची शक्यता; मात्र, 'या' जागेबाबत अद्याप आशा
By घनशाम नवाथे | Published: October 24, 2024 07:12 PM2024-10-24T19:12:03+5:302024-10-24T19:13:58+5:30
उद्धव ठाकरे भेटीत केवळ आश्वासन ..
सांगली : लोकसभेत थेट सांगलीत येऊन उमेदवारीची घोषणा करून उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली होती. परंतु, विधानसभेला आठपैकी एकही मतदारसंघ उध्दवसेनेला अद्याप मिळाला नाही. खानापूर आणि मिरजपैकी एक जागा पदरात पाडून घेण्यासाठी पदाधिकारी व इच्छुक उमेदवार प्रयत्नशील दिसतात. महाआघाडीतून मिरजेची जागा मिळण्याची सध्या तरी शक्यता निर्माण झाली आहे.
दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी जिल्ह्यात विधानसभेला शिवसेनेचा भगवा दोनवेळा फडकवला. पक्षफुटीनंतर ते शिंदेसेनेत डेरेदाखल झाले. उद्धवसेनेत जिल्ह्यातील बरीच जुनी मंडळी कार्यरत आहेत. लोकसभेला सांगलीच्या जागेवर दावा करत थेट उद्धव ठाकरे यांनी मिरजेत येऊन घोषणा केली. जागा पदरात पाडून घेतली. त्यामुळे येथे संघर्ष झाला. जागा मिळवली तरी अपक्ष राहून विशाल पाटील व समर्थकांनी खरी जागा काँग्रेसचीच होती, हे दाखवून दिले.
उद्धव ठाकरे भेटीत केवळ आश्वासन ..
लोकसभेत जागा मिळवण्यात उद्धवसेनेने बाजी मारली, तरी यंदा विधानसभेला आठपैकी एक जागा पदरात पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार केला जात असल्यामुळे अद्याप उद्धवसेनेला एकही जागा जिल्ह्यात मिळवता आली नाही. पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेत सुरुवातीला सांगली, मिरज आणि खानापूर मतदारसंघांवरील दावा सोडू नये, अशी मागणी केली. खासदार राऊत यांनी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
पक्षाला ताकद मिळणार काय?
लोकसभेला जागा मिळवण्यात बाजी मारली तरी विधानसभेला आठपैकी एकतरी जागा मिळेल की नाही, हे निश्चित सांगता येत नाही. परंतु, उद्धवसेनेची जिल्ह्यात ताकद टिकवून ठेवण्यासाठी जागा आवश्यक असल्यामुळे पदाधिकारी अद्याप आशावादी आहेत.
शिंदेसेनेची खानापूरमधून उमेदवारी..
जिल्ह्यात महायुतीतून शिंदेसेनेने खानापूर आटपाडीतून दिवंगत नेते अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर करत बाजी मारली आहे. मात्र, खानापूरला उद्धवसेनेला जागा मिळण्याची आशा मावळत चालली आहे.