'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 02:42 PM2024-11-08T14:42:56+5:302024-11-08T14:47:37+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगली येथे जाहीर सभा घेतली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : 'काँग्रेसचे अध्यक्षच सांगतात काँग्रेस जी आश्वासनं देतं ती काल्पनिक आहेत, ती कधीच पूर्ण होणार नाहीत. पण मी आज तुम्हाला सांगतो, मोदींनी जी आश्वासने दिलीत ती आम्ही पूर्ण केली आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला तर काँग्रेसमध्ये डझनभर नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर केला. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज शिराळा येथे जाहीर सभा घेतली. यावेळी शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
शिराळा येथील सभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र नंबर वन होऊ शकतो. मी मागील महिन्यात महाराष्ट्रातील प्रत्येक भागात फिरलो, त्या सगळीकडे एकच चर्चा आहे, महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे आहे, केंद्रात भाजपाचे सरकार आहे, राज्यात महायुतीचे सरकार बनवा. हे दोन्ही सरकार महाराष्ट्राला नंबर एकचे राज्य बनवायचे काम करतील, असंही अमित शाह म्हणाले.
"औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला पाहिजे, पण आघाडीवाले याला विरोध करत आहेत. उद्धव ठाकरेंचा याला विरोध आहे, शरद पवार तुम्ही कितीही जोर लावा आम्ही औरंगाबादला संभाजीनगर हे नाव देणारच, असा टोलाही शाह यांनी शरद पवार यांना लगावला. जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा आणण्याचा यांचा प्रयत्न आहे, पण आम्ही तो पुन्हा येऊ देणार नाही. काही दिवसापूर्वी मोदींनी वक्फ बोर्डाचे विधेयक आणले या विधेयकालाही या लोकांनी विरोध केला. आघाडीचे सरकार जर सत्तेत आले तर शेतकऱ्यांची जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर होईल. आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला हात लावू देणार नाही, असंही शाह म्हणाले.
शरद पवार यांच्यावर साधला निशाणा
अमित शाह म्हणाले, आम्ही अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी आम्ही शरद पवार आणि राहुल गांधींना बोलावले पण त्यांनी पुन्हा अयोध्येत येईन असं सांगितलं. पण अजूनही ते अयोध्येला गेलेले नाही, त्यांना त्यांच्या व्होट बँकेचे भीती वाटते म्हणून ते अजूनही अयोध्येला गेलेले नाही, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला.