Maharashtra budget 2023: सांगलीत अण्णा भाऊ साठे, देशमुखांच्या स्मारकांसाठी 45 कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 07:02 PM2023-03-10T19:02:35+5:302023-03-10T19:02:58+5:30
जिल्ह्याला भरीव स्वरूपाचे अन्य काहीही मिळाले नाही.
सांगली : राज्याच्या अर्थसंकल्पात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकांसाठी निधीची घोषणा करण्यात आली. याशिवाय सांगलीतील नाट्यगृहाव्यतिरिक्त जिल्ह्याला भरीव स्वरूपाचे अन्य काहीही मिळाले नाही.
वाटेगाव (ता. वाळवा) येथे अण्णा भाऊंच्या स्मारकासाठी २५ कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या वाटेगावात छोटे स्मारक आहे, पण ते गोदामासारखे बांधल्याची टीका दलित महासंघाने केली आहे. छोटी इमारत, त्यासमोर चबुतऱ्यावर अर्धपुतळा असे स्मारकाचे स्वरुप आहे. १९९५ मध्ये भाजप-सेना युती सरकारच्या काळात बांधले होते. अण्णा भाऊंच्या जयंती, पुण्यतिथीला अभिवादनासाठी तेथे गर्दी होते.
२०१९ मध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनीही वाटेगावमधील अण्णा भाऊंच्या वास्तव्याची ठिकाणे नीटनेटकी करण्याची घोषणा केली होती. मुंबईत त्यांचे वास्तव्य असलेल्या जागी स्मृतिभवन उभारण्यात येणार असून, तेथेच त्यांच्या मुलींना घर बांधून देणार असल्याचे सांगितले होते. वाटेगाव येथील स्मारकाच्या विकासासाठीही ५० लाख रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली होती. त्याचे पुढे काय झाले, हे गुलदस्त्यातच आहे. अखेर गुरुवारी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद झाल्याने अण्णा भाऊंच्या चाहत्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
वाटेगावात होणार कामे
वाटेगाव येथील स्मारकामध्ये अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच परिसर सुशोभिकरण करणे, परिसरात सोयी सुविधा पुरवणे, स्मारकाकडे येणारे सर्व रस्ते नूतनीकरण करणे, काँक्रिटीकरण, आरसीसी गटर बांधणे, फूटपाथ तयार करणे अशी कामे २५ कोटी रुपयांच्या निधीतून होणार आहेत.
शिवाजीराव देशमुख यांच्या योगदानाचे स्मरण
विधान परिषदेचे सभापती म्हणून प्रदीर्घ काळ काम केलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांच्या राजकीय व सामाजिक योगदानाचे स्मरण म्हणून कोकरुड (ता. शिराळा) येथे स्मारक उभारले जाणार आहे.
काँग्रेसचा निष्ठावंत सैनिक म्हणून देशमुख यांच्या स्मारकासाठी भाजपच्या सत्तेत निधीची तरतूद व्हावी, यामागील राजकीय गणितही महत्त्वाचे आहे. सध्या भाजपमध्ये असणारे त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांची मर्जी राखण्यासाठीही ही तरतूद असू शकते.