गेल्या 5 वर्षात किती लष्कर आणि पोलीस भरती झाली?; डॉ. अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 09:19 AM2019-10-14T09:19:41+5:302019-10-14T09:20:25+5:30
भयानक बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, रोजगाराची संधी कुठे नाही
सांगली - देशप्रेम आमच्या काळजात आहे, नसानसात आहे, रिकाम्या पोटी सैन्य कधी लढत नाही ही गोष्ट लक्षात ठेवली. आमची पोरं सकाळी सकाळी धावत असताना, लष्करात, पोलिसांत भरती होण्यासाठी जीव तोडून मेहनत करत असतात तरीही पोलीस भरती झाली नाही. आबांच्या काळात 65 हजार पोलीस भरती झाली होती. पण या काळात किती झाली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारला विचारला आहे.
तासगाव कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी उमेदवार सुमन पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात असा एकही मतदारसंघ नाही ज्यात आर.आर आबांची आठवण आली नाही. रोहित पाटलांच्या रुपाने तासगाव-कवठेमहांकाळ पुन्हा धडाडीचं नेतृत्व मिळालं आहे. ही विधानसभेची निवडणूक ही दोन पक्षातील निवडणूक नाही, उमेदवारांची निवडणूक नाही, ही दोन विचारांची निवडणूक आहे. ज्यांनी 5 वर्ष ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, बेरोजगारांच्या प्रश्नांचा खेळखंडोबा केला आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांनी केला.
तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेत कर्जमाफीवर प्रश्न केला त्यावर मुख्यमंत्री म्हणतात प्रत्येक सभेत असे 2-4 नमुने येतात. मुख्यमंत्रीसाहेब, ते नमुने नव्हते तर तो हाडामासाचा माणूस होता, ज्याच्या डोळ्यासमोर त्यांचं भवितव्य होतं, पोराबाळांची काळजी होती म्हणून तो तुम्हाला प्रश्न विचारला त्यावर तुमचं उत्तर भारत माता की जय असं सांगत अमोल कोल्हे यांनी सरकारवर प्रहार केला.
दरम्यान, भयानक बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, रोजगाराची संधी कुठे नाही, अनेक कंपन्यातील लोकांना काढलं जातं आहे. ही हसण्याची परिस्थिती नाही तर चिंतेची परिस्थिती नाही. ज्या माणसाने उभं आयुष्य मेहनत केली, त्यांची बायका-पोरं घरात असतात त्याची नोकरी जाते ही परिस्थिती त्याच्यासमोर उभी राहते ती आपल्याबाबतीत होईल. 72 हजार मेगा भरती होणार होती काय झालं या मेगा भरतीचं? असा सवालही डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारला विचारला आहे.