Sangli: वसगडेत महाराष्ट्र एक्स्प्रेस सहा तास रोखली, प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 06:15 PM2023-09-14T18:15:29+5:302023-09-14T18:16:04+5:30
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुणे-मिरज मार्गावर रेल्वे वाहतूक विस्कळीत
मिरज : पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी संपादित जमिनींचा मोबदला व शेतीकडे जाण्यासाठी सेवा रस्ते करण्याच्या मागणीसाठी वसगडे (ता. पलूस) येथे शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गावर ठिय्या मांडून तब्बल सहा तास गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रोखली. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. आंदोलनामुळे मिरज-पुणे रेल्वे वाहतूक दिवसभर विस्कळीत होती.
वसगडे येथे संपादित जमिनींचा मोबदला व शेतीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यासाठी गेले वर्षभर शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, रेल्वे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गेल्या दहा दिवसांपासून वसगडे रेल्वे गेटवर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करूनही रेल्वेकडून प्रतिसाद न मिळाल्याने वसगडे येथील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी रेल्वे गेटवर ठिय्या मांडला. दुपारी १२ वाजता मिरजेकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस शेतकऱ्यांनी रोखल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलकांना हटविण्यासाठी रेल्वे पोलिस सुरक्षा दल व स्थानिक पोलिस आले.
मात्र, शेतकऱ्यांनी हटण्यास नकार दिल्याने रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिसांचा नाइलाज झाला. तब्बल सहा तास रेल्वेमार्ग रोखल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील प्रवाशांचे हाल झाले. एक्स्प्रेसमधील अनेक प्रवाशांनी इतर वाहनाने सांगली गाठली. रेल्वे गेट बंद असल्याने वसगडे ते पाचवा मैल रस्ताही बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.
मिरजेतून आलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी मागण्यांबाबत कार्यवाही झाल्याशिवाय रेल्वे सोडणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने सायंकाळी पाचपर्यंत महाराष्ट्र एक्स्प्रेस जागेवरच थांबून होती. याबाबत दि. १६ रोजी पुण्यात रेल्वे विभागीय व्यवस्थापक, खासदार, आमदारांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र एक्स्प्रेस मिरजेला रवाना झाली.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
आंदोलकांनी रेल्वेमार्ग रोखल्याने मिरजेतून पुण्याकडे जाणारी जोधपूर एक्स्प्रेस नांद्रे स्थानकात चार तास थांबून होती. मिरजेकडे येणारी संपर्क क्रांती एक्स्प्रेस किर्लोस्करवाडीला दोन तास थांबविण्यात आली. कोल्हापुरातून गोंदियाला जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस सांगली स्थानकात दोन तास थांबून होती. या सर्व रेल्वेगाड्या सायंकाळी रवाना झाल्या. कोल्हापुरात येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसला तब्बल सात तास विलंब झाल्याने या रेल्वेतील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.