महाराष्ट्र जीएसटीचा राष्ट्रीय कर सन्मान पुरस्काराने गौरव, कोल्हापूर विभागाला मिळाला बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:29 PM2023-10-10T14:29:03+5:302023-10-10T14:30:07+5:30
विमा कंपन्यांची १५ हजार कोटींची करचुकवेगिरी उघडकीस आणणाऱ्या कोल्हापूर विभागाला पुरस्कार स्वीकारण्याचा मान
सांगली : देशभर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘टीआयओएल’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या वस्तू व सेवा कर विभागाला गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या ‘जीएसटी’ विभागाला ‘मूल्यवर्धित कर प्रशासन’ श्रेणीत सुवर्ण तर ‘सुधारणावादी राज्य’ श्रेणीत रौप्य पुरस्कार मिळाला. दिल्लीतील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. विमा कंपन्यांची १५ हजार कोटींची करचुकवेगिरी उघडकीस आणणाऱ्या कोल्हापूर विभागाला पुरस्कार स्वीकारण्याचा मान देण्यात आला.
‘टॅक्स इंडिया ऑनलाइन डॉटकॉम’ तथा ‘टीआयओएल’ हा राष्ट्रीय कर पुरस्कार अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जातो. यावर्षी २४ राज्ये स्पर्धेत सहभागी झाली होती. महाराष्ट्राच्या ‘वस्तू व सेवा कर’ विभागाने राबविलेले व्यापार सुविधा कार्यक्रम, परताव्याची सुलभता, अभय योजना, करदात्यांच्या समस्यांचे समाधान, ‘जीएसटी’ कौन्सिलमध्ये केलेले प्रभावी प्रतिनिधित्व, विवाद कमी करण्यासाठीचे प्रयत्न या सर्व गोष्टींच्या मूल्यमापनाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हा पुरस्कार स्वीकारण्याचा मान कोल्हापूर विभागाच्या राज्य कर सहआयुक्त सुनीता थोरात यांना मिळाला. कोल्हापूर विभागाची निवड होणे ही बाब गौरवास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.