महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला, कर्नाटकची बस म्हैसाळजवळ फोडली, कर्नाटकने महाराष्ट्राच्या बसेस रोखल्या
By अशोक डोंबाळे | Published: November 26, 2022 01:10 PM2022-11-26T13:10:50+5:302022-11-26T13:22:30+5:30
कर्नाटकने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या असून महाराष्ट्राच्या बसेसही कागवाड येथे रोखल्या आहेत.
सांगली : जत पूर्व भागाच्या गावावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. याचा फटका दोन्ही राज्याच्या एसटी बसेस आणि प्रवाशांना बसताना दिसत आहे. काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास म्हैसाळ ते मिरज रस्त्यावर म्हैसाळजवळ कर्नाटक परिवहन विभागाच्या अथणी ते पुणे बस क्रमांक (केए२३/एफ १००४) या बसची अज्ञाताने दगडफेक करुन काच फोडली. यामुळे कर्नाटकने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या असून महाराष्ट्राच्या बसेसही कागवाड येथे रोखल्या आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा केल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यामधील वाद टोकाला गेला आहे. दरम्यान, काल शुक्रवारी रात्री रात्रीच्या सुमारास कर्नाटक बस म्हैसाळपासून थोड्या अंतरावर आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने बसच्या पुढील काचेवर दगड मारला.
बसवरील हल्यानंतर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातून सांगली, मिरज आगारातून अथणी, कागवाडला जाणाऱ्या बसेस कर्नाटक पोलिसांनी कागवाडजवळ रोखल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सांगली विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.