महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: कर्नाटकातील ८८५ मराठी गावे अगोदर द्या, मग जतचे बोला; सांगलीतून तीव्र संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:58 PM2022-11-24T12:58:37+5:302022-11-24T12:59:06+5:30
बोम्मई यांच्या दाव्यास जत तालुक्यात तीव्र विरोध
सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकचा असल्याचा दावा केल्यानंतर जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. कर्नाटकातील ८८५ मराठी बहुभाषिक गावे अगोदर महाराष्ट्राला द्या, मग कन्नड गावांचे बोला, असा इशारा सीमा लढ्यातील कार्यकर्त्यांनी दिला असून जत तालुक्यातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी बोम्मई यांच्या दाव्यास तीव्र विरोध दर्शविला.
जत तालुक्यातील ६५ गावांनी २०१२ मध्ये पाणीप्रश्नावर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करीत कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. तोच दाखला देत बोम्मई यांनी ही गावे कर्नाटकात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य मंगळवारी केले. त्यावरून महाराष्ट्रात व विशेषत: सांगली जिल्ह्यात वाद पेटला आहे. बोम्मई यांच्या दाव्यास जत तालुक्यात तीव्र विरोध केला गेला. सीमा लढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी येथील ८८५ मराठी भाषिक गावांचा जुना दावा नव्याने मांडला.
बोम्मई यांनी जत तालुक्यावरून राजकीय भांडवल करू नये. लोकांनी काही वर्षांपूर्वी पाणीप्रश्नावरून कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. त्याचा संदर्भ देऊन दावा करणे अयोग्य आहे. तालुक्यातील पाणीप्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत. उर्वरित कामेही येत्या काही वर्षांत होतील. त्यामुळे कर्नाटकात कोणीही जाण्यास आता इच्छुक नाही.- विक्रम सावंत, आमदार, जत
जत तालुक्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा करणे अयोग्य आहे. आमचा त्यास विरोध राहील. - विलासराव जगताप, माजी आमदार
भूप्रदेश सलगता व बहुभाषिक या मुद्यावर आमच्यातील काही गावे कर्नाटकला व कर्नाटकातील ८८५ मराठी गावे महाराष्ट्राला मिळावी, अशी यापूर्वीच मागणी केली होती. १९५० मधील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत. अगोदर आमची गावे आम्हाला द्या. - ॲड. अजित सूर्यवंशी, सीमा लढ्यातील कार्यकर्ते
जे सरकार भाकरीचा प्रश्न सोडवू शकत नाही, ते असे मुद्दे उकरून काढते. कर्नाटक, महाराष्ट्र व केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने ते असे प्रश्न पेटविण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्याला भीक घालणार नाही. - ॲड. के. डी. शिंदे, सीमा लढ्यातील कार्यकर्ते
आम्ही जत तालुका तर देणार नाहीच, ऊलट बेळगाव, कारवारसह अन्यठिकाणची मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. - प्रा. शरद पाटील, माजी आमदार व सीमा लढ्यातील कार्यकर्ते
जत तालुक्यातील कोणतीही गावे कर्नाटकमध्ये जाणार नाही. जर गावे जाणार नसतील, तर काय उचलून नेणार आहात का? जो पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी मिटलेला आहे. साठ टक्के भागात पाणी पोहोचलेले आहे. उर्वरित ४० टक्के भागात लवकरच पाणी पोहोचेल. आपण दहा वर्ष जत तालुक्याचे आमदार म्हणून काम केले आहे. आजही या गावातले कोणीही कर्नाटकमध्ये जाण्यास तयार नाही. - सुरेश खाडे, पालकमंत्री, सांगली.
यांनी केला विरोध
जत तालुक्यातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते सुभाष कोकळे, जिल्हा परिषद सदस्य तम्मनगौडा रवी यांनीही कर्नाटकच्या दाव्यास विरोध दर्शविला असून, आता तालुक्यातील कोणीही कर्नाटकात जाण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे