महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: 'जतवर अन्याय; पण कर्नाटकात जाणार नाही', माजी आमदार जगतापांची बोम्मईंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:48 PM2022-11-24T12:48:55+5:302022-11-24T13:08:49+5:30

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर जगताप यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत कर्नाटकला खडे बोल सुनावले.

Maharashtra-Karnataka border dispute, Injustice on Jat Taluka, But will not go to Karnataka | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: 'जतवर अन्याय; पण कर्नाटकात जाणार नाही', माजी आमदार जगतापांची बोम्मईंवर टीका

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: 'जतवर अन्याय; पण कर्नाटकात जाणार नाही', माजी आमदार जगतापांची बोम्मईंवर टीका

Next

जत : कर्नाटकने जतला कधीही पाणी दिले नाही. पावसाचे पडलेले पाणी नैसर्गिकरीत्या जत तालुक्यात आले म्हणजे जतला आम्हीच पोसतो असे होत नाही. जत तालुक्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीने कर्नाटकात जाण्याचा ठराव केला नाही, त्याची नोंद कुठेही नाही. असे असताना ४० गावांवर दावा करणे म्हणजे केवळ स्टंट आणि दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे.

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर जगताप यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत कर्नाटकला खडे बोल सुनावले. एकीकडे बेळगाव, निपाणी, कारवार भागातील मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे. त्यांचे समाधान कर्नाटक करू शकले नाही. मग आता जतची चाळीस गावे घेऊन काय साध्य करणार आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, जत तालुक्यावर विकास आणि पाण्याच्या बाबतीत अन्याय झाला ही बाब खरी आहे, म्हणून काय आम्ही आमचे राज्य सोडणार नाही. आम्ही आमच्याच राज्याकडे पाणी व विकासासाठी मागणी मांडत आहे. स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही जत तालुक्याला म्हैसाळचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही. पूर्व भागातील वंचित ६७ गावांसाठी प्रस्तावित असलेल्या विस्तारित योजनेचा प्रश्न सुटत नाही. यासाठी आम्ही पुढाकार घेऊन विस्तारित योजना तयार केली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला तत्त्वत: मंजुरी दिली. पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केवळ सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले. यापेक्षा जास्ती काहीच झाले नाही. ही मोठी खंत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कर्नाटकच्या या स्टंटबाजीवर विचार न करता जतला वरदान ठरणारी विस्तारित योजना मंजूर करावी. आम्ही महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, जाण्याचा प्रश्न नाही, बोम्मई यांनी केलेले वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. त्यात तथ्य नाही. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत उपस्थित होते.

Web Title: Maharashtra-Karnataka border dispute, Injustice on Jat Taluka, But will not go to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली