Sangli: लोकसभेच्या आखाड्यातील पैलवान तासगावच्या मैदानात, तालुक्यात रंगली जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 04:20 PM2023-09-27T16:20:33+5:302023-09-27T16:23:36+5:30
दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
दत्ता पाटील
तासगाव : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना मंगळवारी तासगावात पाठिंबा दिला. चंद्रहार पाटील कुस्तीच्या आखाड्यातून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पाटलांनी तासगावच्या मैदानात एन्ट्री केल्याचे बोलले जात आहे. या पाठिंब्याची तासगाव तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांतील राजकीय इच्छुक मोर्चेबांधणीला लागले आहेत. खासदार संजय पाटील जिल्हाभर मोर्चेबांधणी करत आहेत. तासगाव तालुका खासदारांचे होमग्राउंड आहे. त्यांच्याच होमग्राउंडवर काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकसभेची मशागत केली होती.
मंगळवारी चंद्रहार पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा दिला. जोतीराम जाधव आणि शशिकांत डांगे यांचे तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ सवलती मिळाव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला चंद्रहार पाटील यांनी पाठिंबा दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रहार यांची दिल्ली वारी
चंद्रहार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या तरी इच्छुक नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, पडद्याआड राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्याच अनुषंगाने चंद्रहार पाटील दोन दिवसांत दिल्ली वारी करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या दिल्ली वारीत नेमकी कोणाची भेट घेतली जाणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
आमदार, खासदारांचे दुर्लक्ष
उपोषणकर्त्यांची मागणी थेट शासनाशी संबंधित आहे. शासन पातळीवरून टंचाईग्रस्त जनतेला सुविधा मिळण्यासाठी आमदार आणि खासदारांची भूमिका निर्णायक आहे. मात्र, आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजय पाटील यांनी हे उपोषण दुर्लक्षित केले आहे.
लोकसभा निवडणूक लढवण्याचा सध्या कोणताही विचार केलेला नाही. सद्यस्थितीत सामाजिक कामांवरच लक्ष केंद्रित केले आहे. योग्य वेळी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करु. - पैलवान चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी.