महाराष्ट्राची नवी सूनबाई देखील होणार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, परराज्यातील महिलांसाठी पतीची कागदपत्रे ग्राह्य

By संतोष भिसे | Published: July 11, 2024 05:33 PM2024-07-11T17:33:29+5:302024-07-11T17:39:13+5:30

नारीशक्ती दूतवरुन घरबसल्या अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtra new daughter in law will get the benefit of Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana, Documents of husband required for foreign women | महाराष्ट्राची नवी सूनबाई देखील होणार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, परराज्यातील महिलांसाठी पतीची कागदपत्रे ग्राह्य

महाराष्ट्राची नवी सूनबाई देखील होणार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, परराज्यातील महिलांसाठी पतीची कागदपत्रे ग्राह्य

सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवविवाहित तरुणींना आता पतीच्या कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासनाने तसे आदेश जारी केले असून कागदपत्रांसाठी त्यांची अडवणूक करु नये अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या आहेत.

कर्नाटकात माहेर असलेल्या नवविवाहित तरुणींना या योजनेसाठी कागदपत्रे मिळवताना खूपच धावपळ करावी लागत आहे. शाळेचे दाखले किंवा तत्सम कागदपत्रे कर्नाटकातील असल्याने ती ग्राह्य धरली जात नाहीत. त्यामुळे या नवविवाहितांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. लग्नानंतर त्या महाराष्ट्राच्या नागरिक असतानाही योजना मिळत नसल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने सुधारित आदेश काढला आहे. त्यानुसार त्यांच्या पतीची कागदपत्रे ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात धोडमिसे व महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी यासंदर्भात सर्व गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्ताराधिकारी यांच्या बैठकीत सूचना केल्या.

नारीशक्ती दूतवरुन घरबसल्या भरा अर्ज

नारी शक्ती दूत ॲपवरून ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज ऑनलाईन भरता येणार आहे. त्यासाठी सेतूमध्ये किंवा अंगणवाडी सेविकांकडे जाण्याची गरज नाही. महिलांना मोबाईलवर प्ले स्टोअरमधून हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे लागेल. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका यांनाही हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल.

या ॲपमध्ये अपलोड करावयाची कागदपत्रे अशी : आधार कार्डची प्रत (दोन्ही बाजू), महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह केला असेल, तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे.

वार्षिक अडीच लाखांपर्यंत उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे. पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत अपलोड करावी. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत सादर करावी.

Web Title: Maharashtra new daughter in law will get the benefit of Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana, Documents of husband required for foreign women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.