Maharashtra Politics : "जयंत पाटलांचं अजून तळ्यात मळ्यात, भाजपाशिवाय सांगलीला पर्याय नाही"; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:15 IST2025-04-02T15:14:57+5:302025-04-02T15:15:28+5:30
Maharashtra Politics : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली.

Maharashtra Politics : "जयंत पाटलांचं अजून तळ्यात मळ्यात, भाजपाशिवाय सांगलीला पर्याय नाही"; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा डिवचले
Maharashtra Politics ( Marathi News ) : मागील काही दिवसापासून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर यांनी पुन्हा एकदा आमदार जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्यावर निशाणा साधला.
आई-वडील अन् चुलत्याच्या कृपेनं आमचं बरं चाललंय; अजित पवारांचे बीडमध्ये वक्तव्य
यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवरही भाष्य केले. गोपीचंद पडळकर म्हणाले, जयंत पाटील अजून तळ्यात -मळ्यात करत आहेत.त्यांचे कुठे जायचे ते अजून ठरत नाही. पण आपल्या विरोधात ताकदीने लढायचे हा जयंत पाटील यांचा अजेंडा पक्का आहे, असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला. जयंत पाटील यांना आता गट, पक्ष विचारत नाही. भाजपाशिवाय देशाला आणि सांगलीलाही पर्याय नाही. यामुळे आता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा रोवू, असंही आमदार पडळकर म्हणाले.
या कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे कौतुक केले. सदाभाऊ खोत म्हणाले, पडळकर यांनी दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष केला. गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे. कारण योद्धा रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही ज्यांना नेता म्हणलं ते आमचे देवाभाऊ गोपीचंद पडळकर यांना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाहीत, असंही आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.
मला राज्यपाल तरी करा- सदाभाऊ खोत
यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी मला राज्यपाल तरी करा असं म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला. पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील खासदार होतील. गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील पण मला कुठं तरी राज्यपाल तरी करा. नाही तर आमचं बॅड वाल्यासारखं व्हायचं. बॅडवाल्याचं कसं असतं चांगलं गाणं वाजवायला लागलं की शेजारी असणारे सर्व म्हणतात की पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. तशी आमची अवस्था झाली आहे, सदाभाऊ खोत यांच्या विधानानंतर एकच हशा पिकला.