अमृतसर ते कोल्हापूरदरम्यान महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 01:00 PM2021-07-19T13:00:45+5:302021-07-19T13:05:11+5:30
railway Panjab Sangli Kolhapur : अमृतसर ते कोल्हापूर या नव्या महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसचा प्रस्ताव उत्तर रेल्वेने रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे. मंडळामध्ये त्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, पण ती मंजूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा पंजाबसोबत थेट संपर्क होणार आहे.
संतोष भिसे
सांगली : अमृतसर ते कोल्हापूर या नव्या महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसचा प्रस्ताव उत्तर रेल्वेनेरेल्वे मंडळाकडे पाठवला आहे. मंडळामध्ये त्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, पण ती मंजूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा पंजाबसोबत थेट संपर्क होणार आहे.
प्रस्तावानुसार अमृतसरमधून प्रत्येक मंगळवारी व शनिवारी निघेल, तर कोल्हापुरातून सोमवारी व गुरुवारी निघेल. अमृतसरमधून सकाळी १०.१० वाजता निघालेली एक्सप्रेस जालंधर, लुधियाना, अंबाला, नवी दिल्ली, कोटा, वडोदरा, कल्याण, पुणे, सातारा, मिरजमार्गे कोल्हापुरला दुसऱ्या दिवशी रात्री ८.४० वाजता पोहोचेल. कोल्हापुरातून सकाळी ७.०५ वाजता निघून याच मार्गाने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सव्वापाच वाजता अमृतसरला पोहोचेल.
२२ बोगींच्या एक्सप्रेसला ४ जनरल. नऊ स्लीपर, एक पेन्ट्री, चार थ्री टायर वातानुकुलीत, एक टू टायर वातानुकुलीत आणि एक प्रथमवर्ग कम द्वितीय श्रेणी वातानुकुलीत डबा असेल. अमृतसर ते पुणेदरम्यान विजेच्या इंजिनावर तर पुण्यापासून कोल्हापुरपर्यंत डिझेल इंजिनावर धावेल. अमृतसरमध्ये परतल्यानंतर ही गाडी भागलपुरसाठी आठवड्यातून दोनवेळा धावणार आहे.
पंजाबसाठी पहिलीच एक्सप्रेस
पश्चिम महाराष्ट्रातून थेट पंजाबसाठी ही पहिलीच एक्सप्रेस असेल. यापूर्वी यशवंतपूर - चंदीगड एक्सप्रेस मिरज, सांगलीमार्गे पंजाबसाठी धावत होती, पण कोल्हापुरसाठी तिचा उपयोग नव्हता. शिवाय ती कर्नाटकातून येत असल्याने सांगली, मिरजेसाठीचा कोटाही अत्यंत मर्यादीत होता. कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस या नावाने ती धावायची. कोविडकाळात ती बंद आहे.
नवी प्रस्तावित कोल्हापूर-अमृतसर महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस या भागासाठी हक्काची ठरेल. उत्तर रेल्वेने प्रस्ताव ठेवल्याने ती मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे. सांगली, कोल्हापुरातूनही राजकीय ताकद मिळाल्यास तिला हिरवा कंदील दाखविण्याशिवाय रेल्वे मंडळाला पर्याय नसेल.